समता परिषदेचे डॉ. गणेश खारकर मैदानात
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

शहरात रंगणार विधान परिषद रणसंग्राम
अमरावती /25 मे – महायुतीने अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नसतानाच, अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रणांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सचिव डॉ. गणेश खारकर यांनी पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचे संकेत दिले आहेत.
समता परिषदेचे सरचिटणीस किशोर मानकर यांनी आज पत्रकार परिषदेत खारकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केल्याने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. गणेश खारकर हे बहुजन चळवळीतील एक अत्यंत कार्यतत्पर आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ओबीसी, दलित, शोषित, पीडित आणि अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करून गरिबांना न्याय मिळवून दिला आहे. अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेशी त्यांचा थेट आणि दांडगा जनसंपर्क असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची मोठी ओळख आहे. नुकतीच फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकार्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी डॉ. खारकर यांनीच ही निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली आणि अनेकांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला. डॉ. गणेश खारकर हे छगन भुजबळ यांचे खंदे आणि अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. कार्यकर्त्यांच्या मते, त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी आणि प्रचारात नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अमरावती शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे एक मोठे आणि मजबूत जाळे विणले आहे. किशोर मानकर यांनी सांगितले की, खारकर यांच्या उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली जाईल. या शिष्टमंडळात ग्राहक कल्याण परिषद, ओबीसी अधिकार परिषद, महामानव प्रतिष्ठान, फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांसह अनेक सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर पक्षाकडून डॉ. गणेश खारकर यांना अधिकृत उमेदवारी मिळाली, तर अमरावतीची ही निवडणूक चांगलीच रंगतदार होईल. या पत्रकार परिषदेला किशोर मानकर यांच्यासह समता परिषद आणि इतर संलग्न सामाजिक संघटनांचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




