डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून गौरवले गेले

प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांचे प्रतिपादन

अमरावती /8 डिसेंबर : कायदा, इतिहास, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य, राजकारण ते युद्धशास्त्र अशा किमान 25 विविध विषयांवरील तब्बल 25,000 ग्रंथांचे अभ्यासक असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे अखंड उपासक होते. त्यांची ही अद्वितीय ज्ञाननिष्ठा पाहूनच जगभर त्यांना ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ या श्रेष्ठ उपाधीने गौरविले गेले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी केले.अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
जिल्हा वकील संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी वकील संघाच्या सभागृहामध्ये प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आशिष लांडे होते. सचिव अ‍ॅड. अमोल मुरळ तसेच अ‍ॅड. विद्या मानके, अ‍ॅड. ऋषिकेश उपाध्ये, अ‍ॅड. सुमित शर्मा, अ‍ॅड. अक्षय बोळे, अ‍ॅड. नेतल मल्ला, अ‍ॅड. विशाखा तागडे, अ‍ॅड. परिहार, अ‍ॅड. पूनम परीट आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. पुढे डॉ. देशमुख म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अस्सल राष्ट्रभक्त, भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि राष्ट्रमातेचे खरे सुपुत्र होते. आपल्या संस्कृतीतील विकृती दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले, मात्र कोणतीही कृती राष्ट्रहिताला बाधा पोहोचणार नाही याची त्यांनी सदैव काळजी घेतली. बाबासाहेबांची ज्ञानसाधना, संवेदनशीलता, करारी वृत्ती आणि समाजउत्थानाची तळमळ यांचा भावस्पर्शी आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला. बाहेरून करारी दिसणारे बाबासाहेब मनाने अत्यंत कोमल आणि भावनाशील होते, असे सांगत त्यांनी बाबासाहेबांवरील डॉक्टर्स धनंजय कीर यांच्या ते दिसायला गंभीर होते पण आंबेडकर भावनांचे झरे होतेया वर्णनाचा उल्लेख केला. ग्रंथप्रेमाबद्दल बोलताना डॉ. देशमुख म्हणाले की, लंडनमध्ये आपल्या एका वेळच्या जेवणाचे त्याग करून त्यांनी ग्रंथालय सदस्यत्व घेतले होते. समाजउद्धाराची प्रेरणा आणि ज्ञानाची साधना हेच त्यांचे आयुष्यभराचे ध्येय होते. त्यांच्या अंगभूत करारी नेतृत्वासोबत आश्चर्यकारक संवेदनशीलता व प्रचंड राष्ट्रभक्ती लाभलेली होती. राष्ट्रहितासाठी ते कधीही तडजोड करत नसत, असेही त्यांनी नमूद केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय! व भारत माता की जय! या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी वकील बांधवांची मोठी उपस्थिती लाभली होती.

संबंधित बातम्या

Back to top button