तपासणीच्या बहाण्याने बालिकेचा विनयभंग : डॉक्टरवर गजाआड
पार्वतीनगर परिसरातील घटना

-मुलीने आईसमोर उघड केली अपबीती
अमरावती / 27 ऑगस्ट : जिथे आरोग्यसेवा पवित्र मानली जाते, तिथेच एका विकृत मनोवृत्तीने विश्वासघाताचा केल्याचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे. पार्वतीनगर येथे ‘मोरया क्लिनिक’ चालवणारा डॉ. सागर अशोकराव गोरडे (33) यास, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अश्लील कृत्य करून विनयभंग प्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी अटक केली आहे.
घटना अशी घडली की, 26 ऑगस्टच्या संध्याकाळी तब्येत बिघडल्याने संबंधित मुलगी उपचारासाठी मोरया क्लिनिकमध्ये गेली होती. तपासणीचा बहाणा करून डॉ. गोरडे यांनी तिला आत नेले. बीपी तपासणीसाठी स्टेथोस्कोप किंवा यंत्र वापरण्याऐवजी आरोपीने सरळ आपल्या हातांनीच तिच्या शरीराला चुकीच्या हेतूने स्पर्श करायला सुरुवात केली. मुलगी घाबरून उठण्याचा प्रयत्न करताच, तिला अडवत आरोपी म्हणाला, हे तुला आवडले असेल तर उद्या परत ये.
या प्रकाराने भयभीत झालेली मुलगी घाईने घरी परतली आणि तिने घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईसोबत तिने धैर्याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तात्काळ कारवाई केली. डॉक्टर गोरडे यांच्यावर ‘पोक्सो कायदा’च्या कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. आरोग्यसेवेचे मंदिर मानले जाणारे दवाखानेच जर विकृतीचे अड्डे बनू लागले, तर सामान्यांचा विश्वास कोठे राहील? पोलिस कारवाईनंतर परिसरात संताप, आश्चर्याचा धक्का आणि शेजार्यांत चीड व्यक्त केली जात आहे.




