जनगणनेसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला सुरवात
जनगणनेचे काम गांभीर्यपूर्वक करावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती /16 मार्च : संपूर्ण देशात जनगणनेला सुरवात करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्यात येत आहे. देशाचे खरे चित्र या जनगणनेतून समोर येणार असल्याने यात सहभागी सर्वांनी जनगणनेचे काम गांभीर्यपूर्वक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जनगणना 2027च्या अनुषंगाने आजपासून नियोजन भवनात तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात येत आहे. या प्रशिक्षण वर्गाचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, महापालिका उपायुक्त योगेश पिठे, सहआयुक्त विकास खंडारे, जिल्हा सूचना अधिकारी मनिषकुमार, तसेच मार्गदर्शक म्हणून जनगणना संचालनालाचे सहायक व्यवस्थापक प्रविण भगत, ऋषीकेश पाथरे उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, भारतातील जनगणनेला समृद्ध वारसा आहे. या जनगणनेमधून आलेल्या निष्कर्षावर निती आयोग काम करीत असते. यातून येणार्या बाबींतून देशाचे प्रतिबिंब उमटत असते. जनगणनेला आकडेवारीचा आधार असल्याने ती तथ्यांवर खरी उतरणारी असते. यावेळी पहिल्यांदाच पवर ही जनगणना होणार आहे. त्यामुळे बदलांची नोंद घेऊन कार्य करावे लागणार आहे. ही जनगणना कायद्याच्या आधारे होत असल्याने काम करणे बंधनकारक असून नागरिकांना माहिती द्यावी लागणार आहे. यावेळी जातनिहाय जनगणना होणार असून यात काळजीपूर्वक नोंदी घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. श्रीमती शर्मा यांनी यावर्षीची जनगणना ही 16 वर्षानंतर होत आहे. यातून निर्माण होणारा डाटा हा देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. जनगणनेच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील घरभेटीचे नियोजन करण्यात आले आहे, त्यामुळे जनगणनेच्या कामात अडचण निर्माण होणार नसल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी जणगणना कक्षाच्या राधिका देशमुख आणि भावना जिचकार यांनी सहकार्य केले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सूत्रसंचालन केले. महापालिकेचे सहायक आयुक्त भूषण पुसदकर यांनी आभार मानले.




