जिल्हा बँकेची आता सर्व गावांत एटीएम सुविधा

निविदा सूचना जारी, कंपण्यांना आवाहन

अमरावती / 10 जुलै: माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर त्यांनी बँकेतर्फे शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये एटीएमची सुविधा उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. त्याला आता मूर्त रुप मिळणार आहे. बँकेने गावोगावी एटीएम स्थापन करण्यासाठी निविदा सूचना जारी केली आहे. केवळ 50 हजार रुपये ईएमडी रक्कम अदा करुन निविदा सादर करण्याचे आवाहन बँकेने कंपन्यांना केले आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आयएफएससी कोड राष्ट्रीयकृत यस बँकेशी संलग्न आहे.
निविदा सूचनेनूसार 2 हजार रुपये भरुन कंपण्या निविदा अर्ज प्राप्त करु शकतात. निविदा सादर करण्यासाठी 19 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अनेक गावे आणि ठिकाणांवर ग्राहकांना एटीएम सुविधा उपलब्ध करुन देत त्यांच्या व्यवहारात सुलभता आणण्यासाठी जिल्हा बँक हे पाउल उचलत आहे. त्यानुसार ही निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेतील सूत्रांनी दिली आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्ह्यात हजारो खातेधारक आहेत. त्यात बहुतांश ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा समावेश आहे. त्यांच्या सुविधेसाठीच जिल्हा बँकेकडून ही एटीएम योजना राबविण्यात येत आहे. बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू हे खातेधारकांना आधुनिक, तत्पर आणि उत्तम सुविधा देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येत आहेत. गावोगावी एटीएम स्थापन केल्यानंतर त्यांच्या देखभालीसाठीही निविदा जारी होण्याची शक्यता आहे. दररोज एटीएममध्ये रक्कम टाकणे आणि एटीएमची सुरक्षा तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता यांचा समावेश या निविदेत राहु शकतो.

संबंधित बातम्या

Back to top button