जिल्हा बँकेचे संचालक आनंद काळेंना अपात्रतेची नोटिस
बच्चू कडू यांना पून्हा झटका

-विभागीय सहनिबंधकांची कारवाई
-14 जुलैपर्यंत उत्तर मागितले
अमरावती / 2 जुलै: अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांना पून्हा एकदा झटका बसला आहे. त्यांचे सहकारी आणि बँकेचे सत्तारुढ गटातील संचालक आनंद काळे यांना विभागीय सह निबंधकांनी अपात्रतेची नोटिस बजावली आहे. त्यांना 14 जुलैपर्यंत आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्हा बँकेत सत्तारुढ आणि विरोधी गटात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी बबलू देशमुख गटाचे संचालक प्रकाश काळबांडे यांना अपात्र ठरविण्यात आल्यानंतर विरोधकांनी थेट अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावरच निशाना साधला आहे. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विरोधी गटाकडून चांगलाच जोर लावला जात आहे. बच्चू कडू यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाने दिलासा मिळाला असतानाच आता त्यांचे सहकारी संचालक आनंद काळे यांना विभागीय सहनिबंधकांनी अपात्रतेची नोटिस बजावली आहे.
बँकेचे संचालक हरिभाउ मोहोड आणि अन्य 11 संचालकांनी 21 एप्रिल रोजी संचालक आनंद काळे यांच्या विरोधात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 78 (अ) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, याकरिता अर्ज सादर केला होता. आनंद काळे हे जिल्हा बँकेचे संचालक झाल्यापासून मनमानी आणि बँकेच्या हिताला बाधा पोहोचेल अशा पद्धतीने कामकाज केले जात असल्याचा ठपका या अर्जातून ठेवण्यात आला आहे. काळे यांच्यावर फसवणुकीचे प्रकरण दाखल आहे. विविध प्रवास भत्ते आणि अन्य कारणांनी काळे यांनी बँकेतून 2 लाख 28 हजार 328 रुपयांची रक्कम बनावट बिलांच्या आधारे उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
21 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत काळे यांनी केलेला खर्च नामंजूर करुन त्यांना सदर रक्कम बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांनी दर्शविलेला खर्च अवैध असल्याचे स्पष्ट होत असल्याने विभागीय सहनिबंधकांनी काळे यांना अपात्रतेची नोटिस बजावली आहे. हा बँकेतील बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील सत्तारुढ गटासाठी मोठा धक्का समजला जात आहे. आनंद काळे यांना 14 जुलैपर्यंत आपले म्हणणे सादर करावयाचे आहे. त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही तर जर काळे यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले जाईल, त्यांना पुढील 5 वर्ष बँकेची निवडणूक लढता येणार नाही, असे या नोटिसमध्ये म्हटले आहे. आता आनंद काळे यावर काय उत्तर सादर करतात याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.




