डिजिटल अरेस्ट’चा सापळा; महिलेचे 17 लाख लुबाडले
मुंबई पोलिस असल्याचे भासवून धमकावले

-सायबर गुन्हेगारांची नवी पद्धत समोर
अमरावती / 27 ऑगस्ट : सायबर गुन्हेगारांचा सापळा दिवसेंदिवस अधिक धोकादायक ठरत आहे. गाडगेनगरातील एका महिलेची तब्बल 17 लाख 20 हजार 230 रुपयांनी फसवणूक करण्यात आली असून ‘डिजिटल अरेस्ट’ या नावाखाली घडलेली ही घटना थक्क करणारी आहे. मुंबई पोलीस असल्याचे भासवून आणि अश्लील व्हिडिओ पाठविल्याचा खोटा ठपका ठेवून गुन्हेगारांनी भीतीचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
26 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास संबंधित महिलेला अज्ञात व्यक्तीकडून कॉल आला. “मी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलतोय,” असा परिचय देत त्या व्यक्तीने महिलेवर गंभीर आरोप ठेवले. “तुमच्या आधारकार्डवर सिमकार्ड घेतले आहे आणि त्यावरून अश्लील फोटो व व्हिडिओ पाठविले जात आहेत. त्यामुळे पोलीस तुमच्या अटकेसाठी येत आहेत,” अशी भीती दाखविण्यात आली.
याच वेळी “तुम्ही सध्या डिजिटल अरेस्ट आहात,” असे सांगत आरोपींनी आणखी गोंधळ निर्माण केला. “कारवाई टाळायची असेल तर दिलेल्या खात्यात पैसे जमा करा,” असे सांगत वेगवेगळ्या खात्यांतून लाखोंची उचलपट्टी करण्यात आली. काही वेळातच 17 लाखांपेक्षा अधिक रक्कम आरोपींकडून हिसकावली गेली. पैसे दिल्यानंतरच महिलेला फसवणुकीचा उलगडा झाला आणि तिने तातडीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
सायबर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 318(4), 319(2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(अ), 66(ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ ही संज्ञा अनेकांना परिचित नसल्याने अशा पद्धतीने भीती निर्माण करून नागरिकांना जाळ्यात ओढले जात आहे. “तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, पोलिस अटक करणार आहेत,” असे सांगून मानसिक दबाव आणून पैसे उकळले जातात. सायबर पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अज्ञात व्यक्तीचा कॉल आल्यास घाबरू नये. पोलिस अथवा सरकारी यंत्रणा कधीही फोनवरून पैसे मागत नाहीत. संशयास्पद कॉल आल्यास तत्काळ 1930 या राष्ट्रीय हेल्पलाइनवर किंवा स्थानिक सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.




