धारणी पं.स. चा लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात

घरकुलाच्या धनादेशासाठी मागितली लाच

-10 हजार स्विकारताना रंगेहाथ अटक
अमरावती / 10 जुलै: शासकिय घरकुल योजनेच्या अनुदानाचा धनादेश काढून देण्यासाठी एका लाभार्थ्याकडून 10 हजार रुपयांची लाच स्विकारताना धारणी पंचायत समितीच्या एका कनिष्ठ अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. धारणी पंचायत समितीच्या कार्यालयातच आज गुरुवारी, दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पंकज रमेश निंघोट (30) असे लाचखोर कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.
धारणी पंचायत समितीमध्ये ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून तो कार्यरत आहे. तो मुळचा तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील रहिवासी असलेला पंकज निंघोट नोकरीनिमित्त धारणी येथे टांक लेआउट, जवाहर नगरमध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. पंकज निंघोट याच्या विरोधात रमाई आवास योजनेत लाभार्थी असलेल्या एका व्यक्तीने एसीबीला 9 जुलै रोजी तक्रार दिली होती. तक्रारकर्त्याला धारणी पंचायत समितीमधून शासकिय घरकुलाचा तिसर्‍या टप्प्याचा धनादेश घ्यायचा होता. हे काम अभियंता पंकज निंघोट याच्याकडे होता. धनादेशासाठी सदर व्यक्तीने निंघोट याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने धनादेश काढून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितली.
धनादेश काढून देण्यापूर्वी 10 हजार आणि नंतर 5 हजार रुपये देण्याचे ठरले. 10 हजार रुपये देण्याकरिता आज 10 जुलैचा दिवस निश्चित करण्यात आला होता. रक्कम घेउन तक्रारकर्त्याला पंचायत समितीमध्ये निंघोटने बोलाविले होते. मात्र दुसरीकडे या लाभार्थ्याने पंकज निंघोट विरोधात अमरावती येथे लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. त्यावरुन आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास एसीबीच्या पथकाने धारणी पंचायत समितीमध्ये सापळा रचला. तक्रारकर्ते यांनी पंकज निंघोट याला त्यांच्या कार्यालयात 10 हजार रुपये देताच एसीबीच्या पथकाने लाच स्विकारताना पंकज निंघोटला रंगेहाथ पंचांसमक्ष अटक केली.
अभियंता पंकज निंघोट याच्यावर धारणी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस उपअधीक्षक सुनिल किणगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक सुजाता बनसोड, मेसरे, फड, अंमलदार प्रमोद रायपुरे, शैलेश कडू, आशिष जांभोळे, सतिश किटुकले, शेंडे यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

Back to top button