धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावे
जालन्यातील उपोषणाची दखल घेण्याची मागणी

अमरावती /22 सप्टेंबर : धनगर समाजाला घटनात्मकदृष्ट्या अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून तात्काळ आरक्षणाचे फायदे देण्यात यावे, तसेच धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालन्यात उपोषण करणाऱ्या दीपक बोर्हाडे यांच्या उपोषाची दखल घेण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह अमरावती जिल्हा सकल धनगर समाजाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली. धनगर समाजाच्या समाजबांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला. शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये असेही उल्लेख करण्यात आला की, 2014 मध्ये बारामती येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाच्या अंमलबजावणीची घोषणाही करण्यात आली होती; परंतु शेकडो बैठकांनंतर आणि आंदोलन करूनही आजपर्यंत शासनाने आश्वासन पूर्ण केलेले नाही. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी दीपक बोर्हाडे 17 सप्टेंबरपासून जालना येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ आमरण उपोषण करत आहेत, आणि सोमवारी त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे. तरीही, सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही, ज्यामुळे धनगर समाजबांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. आंदोलकांनी सरकारला अल्टिमेटम दिले आहे की, धनगर समाजाला आरक्षण लागू करून दोन दिवसांत बोर्हाडे यांचे उपोषण संपवावे, अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन छेडले जाईल, अशी मागणी करण्यात आली. तसेच बोर्हाडे यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.




