देवाभाऊंचा रोड-शो ‘धुरंधर’!

शहरभर पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

* भाजपच्या उमेदवारांना मिळाले बळ

* लाडक्या बहिणींची लक्षवेधी उपस्थिती

अमरावती /4 जानेवारी – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी अमरावतीत भव्य रोड-शो आयोजित करण्यात आला होता. पंचवटी चौकात दुपारी 2 वाजता दरम्यान सुरू झालेल्या या रोड-शोला शहरभरातील नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध चौकांवर पुष्पवृष्टी, ढोलताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले, तसेच भाजपाच्या झेंड्यांनी सजलेले मार्ग आणि उमेदवारांसाठी केलेल्या विशेष जल्लोषामुळे रोड-शोचा उत्साह रंगतदार ठरला. या रोड-शोमध्ये आ.संजय कुटे, खा.अनिल बोंडे, माजी खा. नवनीत राणा, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, आ. प्रवीण पोटे, आ.केवलराम काळे, आ.राजेश वानखडे, आ.प्रवीण तायडे, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे तसेच निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर, प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, प्रा. दिनेश सूर्यवंशी, रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे रोड-शो पंचवटी चौकातून सुरू झाले आणि गाडगे नगर, शेगाव नाका, विलास नगर, रामपुरी कॅम्प, चौधरी चौक, जयस्तंभ चौक, श्याम चौक, राजकमल चौक, गांधी चौक, शिलांगण रोड, नविन बियाणी चौक आणि साईनगर या मार्गाने शहरभर पसरले. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून, ढोलताश्यांच्या तालावर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत केले. महिलांची मोठी उपस्थिती आणि मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंतचा उत्साह रोड-शोमध्ये स्पष्ट दिसत होता. रोड-शोच्या मार्गावर भाजपाचे झेंडे, देवेंद्र फडणवीस यांचे होर्डींग्ज आणि रंगीत पताके लावण्यात आले होते. गाडगे नगर येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. शेगाव नाका, विलास नगर, रामपुरी कॅम्प, चौधरी चौक, जयस्तंभ चौक, श्याम चौक आणि राजकमल चौकात नागरिकांनी जोरदार उत्साह व्यक्त केला. काही ठिकाणी ढोलताशे वाजवून वातावरण अधिक रंगतदार बनवले गेले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचाराला फक्त 9 दिवस उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रा, सभा, मुलाखती आणि रोड-शो अशा विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. अमरावतीत नागरिकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून हे स्पष्ट होते की मागील भाजपाच्या मनपाकरीता केलेल्या विकासकामांमुळे जनता पक्षाच्या बाजूने आहे.
विरोधकांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, काही विरोधक फक्त मराठी महापौर हवा, असे सांगतात, परंतु त्यांची नेमकी संकल्पना काय आहे ते स्पष्ट नाही. 25 वर्षे मनपाची सत्ता त्यांच्या हाती होती आणि त्यांनी काय केले याचे मोजमाप जनता करेल. अमरावती हे पश्चिम विदर्भाची राजधानी असून शिक्षण क्षेत्रात हे शहर महत्त्वाचे स्थान राखते. महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी येथे शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली आणि त्यामुळे शिक्षणाचा प्रचार व प्रसार झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सरकारने अमरावतीत आधुनिक विमानतळ आणि मनपासाठी आधुनिक इमारत बांधण्याच्या कामाला गती दिली आहे. यावरूनच भाजप उमेदवारांना जनतेकडून संपूर्ण पाठिंबा मिळेल, असे सांगत त्यांनी रोड-शोमध्ये दिसलेल्या उत्साहावरून आगामी निवडणुकीत अमरावती महानगरपालिकेत भाजपाची सत्ता कायम राहणार असल्याचे ठाम मत व्यक्त केले.
गांधी चौकात पोहोचल्यावर मोठ्या संख्येने नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. अंबा व एकविरा देवी मंदिरासमोर देवेंद्र फडणवीस यांनी आशीर्वाद घेतले आणि मंदिराचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. गौरक्षण चौकात ते रोड-शोच्या वाहनातून उतरले आणि त्यांच्यासाठी तयार केलेल्या वाहनातून साईनगरकडे मार्गक्रमण करत पत्रकार आणि नागरिकांशी संवाद साधला. पोलिस आयुक्त राकेश ओला आणि त्यांच्या टीमने रोड-शोच्या सुरक्षेची काळजी घेतली.
रोड-शोच्या मार्गावर भाजपाचे कार्यकर्ते प्रत्येक चौकावर उपस्थित होते. रोड-शो गाडीतून नागरिकांना संदेश देणे, उमेदवारांची उपस्थिती दाखवणे आणि शहरभर प्रचार करण्याचे उद्दिष्ट यशस्वी झाले. सुमारे 12 किलोमीटरच्या अंतरावर नागरिकांनी पुष्पवृष्टी, ढोलताश्यांचा गजर आणि जल्लोषाने रोड-शो रंगवला. महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला, ज्यामुळे रोड-शो अधिक प्रभावी आणि संस्मरणीय ठरला.
मुख्यमंत्र्यांनी रोड-शोच्या माध्यमातून सांगितले की, अमरावतीत गेल्या काही वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांचा विश्वास भाजपावर टिकून आहे. मनपाकरीता बांधण्यात आलेले पायाभूत सुविधा, शिक्षण संस्था, सामाजिक प्रकल्प आणि शहराच्या विकासाची योजना हे लोकांना दिसत असल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाच्या हाती सत्ता येण्याची शक्यता प्रबल आहे. रविवारीच्या या रोड-शोने अमरावती शहरात वातावरण पूर्णपणे भाजपाच्या पक्षाभिमुख केले. विविध चौकांवर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपाच्या उमेदवारांना बळ मिळाले असून आगामी निवडणुकीसाठी हा रोड-शो प्रभावी ठरला आहे.?

संबंधित बातम्या

Back to top button