उद्या पाणी टंचाईवर सविस्तर चर्चा

तालुक्याचा पाणी प्रश्न निकाली निघणार

* आ. रवी राणा घेणार आढावा बैठक
* प्रशासकीय यंत्रणेला मालटेकडीवर हजर राहण्याचे आदेश

अमरावती / 5 मार्च : तालुक्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या तीव्रतेसोबतच पाणी टंचाईच्या झळा आता अधिक जाणवू लागल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर, विधानसभेच्या आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या शनिवार, 7 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता मालटेकडी जवळील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सभागृहात या पाणी टंचाई संदर्भातील एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत केवळ कागदी आराखडे न पाहता, प्रत्यक्ष जमिनीवर कोणती कामे होणार याचा सविस्तर आढावा आमदार रवी राणा घेणार आहेत.
या महत्त्वाच्या बैठकीला महसूल विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भात सर्व संबंधित विभागांना उपस्थित राहण्याचे कडक निर्देश आधीच दिले आहेत. विशेष म्हणजे, गावातील नेमकी अडचण समजून घेण्यासाठी सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि सचिव यांना हजर ठेवण्याची जबाबदारी गटविकास अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. गावागावातील पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या तक्रारी दोन प्रतींमध्ये उमेश ढोणे (खा. स. भ्रमणध्वनी क्रमांक 9049067331) यांच्याकडे सोपवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीमुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गावची तक्रार मांडण्याची मोठी संधी -तालुक्यातील ज्या गावांमध्ये पाण्याचे मोठे हाल होत आहेत, अशा गावकर्‍यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात उमेश ढोणे यांच्याकडे द्याव्यात, जेणेकरून बैठकीत त्यावर त्वरित निर्णय घेता येईल.

संबंधित बातम्या

Back to top button