दीपस्तंभ पुरस्कार लोणीच्या वं.वसंतदास महाराज पतसंस्थेला प्रदान
सहकार क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय

वरुड । 14 ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, पुणे यांच्यातर्फे देण्यात येणारा सहकार क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार लोणी येथील वं. वसंतदास महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला गोकर्ण (कर्नाटक) येथे भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार 2024-25 करिता असून पुणे येथील सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष गोपाल मालपे, सुधीर ढोले, लक्ष्मीकांत काळे, दामोधर आंडे आणि व्यवस्थापक प्रवीण मेंढे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. उत्कृष्टपणे कामकाज करणाऱ्या तसेच सामाजिक दायित्वाची भावना ठेवून समाज आणि राष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्याकरता मोलाचे कार्य करणाऱ्या, सहकार खात्याचे आदर्श प्रमाणक पूर्ण करून मार्गदर्शक तत्त्वानुसार कामकाज करणाऱ्या आणि संस्थेचा व्यवसाय वाढवून सतत प्रगती साधणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. या कार्यामुळे ही संस्था इतर सहकारी संस्थांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरत आहे. वं. वसंतदास महाराज सहकारी पतसंस्था आपल्या पारदर्शी आर्थिक व्यवहार, नियमित व्यवसायवाढ, आर्थिक नियोजन, व्यवसायातील दूरदृष्टी आणि व्यावसायिक कौशल्य असणारे संचालक मंडळ, अनुभवी कर्मचारीवर्ग आणि त्यांच्या कार्यक्षमतेमुळे सतत प्रगती करत आहे. सभासद आणि ग्राहकांच्या ठाम विश्वासामुळे संस्थेला दरवर्षी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेचा एकूण व्यवसाय 92 कोटी रुपयांचा असून ठेवी, कर्ज, गुंतवणूक, सीडी रेशो, आर्थिक उलाढाल, स्वनिधी आणि निधीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या संस्थेचे 4,816 सभासद असून या आर्थिक वर्षात संस्थेला 72 लाख रुपयांचा नफा झालेला आहे. संस्थेचा एनपीए प्रमाण 5 टक्के तर निव्वळ एनपीए 0 टक्के आहे. संस्था आर्थिक व्यवहाराबरोबरच विविध सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मुख्यमंत्री सहायता निधीला योगदान, पूरग्रस्तांना मदत, कोरोना काळात औषधी किट वाटप, बचत गट महिलांना प्रशिक्षण, मकर संक्रांत निमित्त महिला सभासदांना भेटवस्तू वाटप, तसेच सत्संग कार्यक्रमांसारखे अनेक उपक्रम संस्था राबवत आहे. संस्थेला मिळालेला दीपस्तंभ पुरस्कार हा तिच्या कार्यकुशलतेचा आणि प्रतिष्ठेचा गौरव आहे. या पुरस्काराने संस्थेने सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवला असून 22 वर्षांच्या कार्यकाळात संस्थेला आतापर्यंत 17 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. संस्थेचे अध्यक्ष गोपाल मालपे यांनी सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार आणि हितचिंतकांचे आभार मानत संस्थेची प्रगती अखंडपणे सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार संस्था सहाय्यक निबंधक डॉ. आशिष चर्जन यांचे मार्गदर्शन नियमितपणे लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.




