जिल्ह्यात सर्वत्र दीपोत्सवाचा उत्साह
घराघरांसह, कार्यालये, प्रतिष्ठाणांवर आकर्षक रोषणाई

* यावर्षी दिवाळी दोन दिवस
अमरावती /19 ऑक्टोबर : देशभरात दीपोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. यावर्षी भारतीय कॅलेंडरनुसार दिवाळी दोन दिवसांची आली असून, या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातही दिवाळी दोन दिवस साजरी केली जाणार आहे. लक्ष्मीपूजनाची तारीख संबंधित पुजार्यांच्या सल्ल्यानुसार ठरवण्यात आली असून, अमरावतीतील अनेक ठिकाणी सोमवारी तर दुकानांमध्ये मंगळवारी लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल. दरम्यान, सर्वत्र दिवाळीचा आनंद आणि उत्साह दिसून येत आहे. सगळीकडे आकर्षक रोषणाईने झगमगाट झाला असून, भेटवस्तूंची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्याच्या बहुतेक भागात प्रकाशोत्सवाचा आनंद दिसून येत आहे. शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वच क्षेत्रात ग्राहकांची गर्दी दिसून आली. सोन्यापासून ते मोटारी, घरगुती उपकरणे, भांडी आणि स्वच्छता उपकरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. यावरून दिवाळीसाठीचा उत्साह स्पष्टपणे जाणवला. बाजारात विक्रमी खरेदीचे वातावरण दिसून आले असून, मोदी सरकारने जीएसटी दरात केलेली सवलत हे देखील एक कारण असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्ताचा पुरेपूर फायदा घेत बाजारपेठेत पैशांची उधळण केली. मोठ्या प्रमाणात दिवेही खरेदी करण्यात आले.
मोची गली आणि जवाहर गेट येथील व्यापार्यांनी सांगितले की, यावर्षी लोकांनी स्वदेशी आणि स्थानिक वस्तूंना प्राधान्य दिले. भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीचा ट्रेंड अलीकडच्या काळात अधिक वाढला असून, नातेवाईक, व्यावसायिक सहकारी आणि मित्रांमध्ये मिठाई व सुक्या मेव्याच्या भेटवस्तूंची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 70,000 भेटवस्तू विकल्या गेल्या असून, मंगळवारी दिवाळी आणि लक्ष्मीपूजन असल्याने काही ठिकाणी गिफ्ट बॉक्सची विक्री अजूनही सुरू आहे, त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पाच दिवस चालणार्या या प्रकाशोत्सवाची सुरुवात धनतेरसने झाली असून, या दरम्यान सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे, कार्तिक महिन्याच्या निमित्ताने काकड आरतीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच भाविकांची मंदिरात गर्दी दिसून येते. मंदिर परिसर पहाटेपासूनच घंटांच्या निनादाने दुमदुमून जातो आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते.




