सुशिल बेले यांच्या आमरण उपोषणातील मागण्यांवर होणार निर्णायक चर्चा
नगरपरिषद कार्यालयात मंगळवारी विशेष बैठक

वरुड । 5 ऑक्टोबर – नगर परिषदेतील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी वरूड नगर परिषद कार्यालयात येत्या 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशिल बेले यांच्या आमरण उपोषणातील प्रमुख मागण्यांशी संबंधित असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी अधिकृत पत्राद्वारे त्यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की आपल्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात झालेल्या समितीच्या चर्चेनुसार नगर परिषद वरूड येथे सभा आयोजित करण्यात आली असून, याआधी 26 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत तालुक्यातील नऊ विषय मार्गी लागले होते. उर्वरित जिल्हा परिषद बांधकाम विभागातील प्रश्नांवर उपविभागीय अधिकारी स्वतः देखरेख करून कारवाई करणार असल्याचे ठरले होते. त्यामुळे आता नगर परिषद संबंधित उर्वरित प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी ही निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध नऊ विषयांवर चर्चा होणार असून या बैठकीला आमदार उमेश (चंदू) यावलकर, उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार, तहसीलदार रामदास शळे आणि पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सुशिल बेले यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही बैठक वरूड तालुक्यातील नागरी प्रश्नांच्या निराकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.




