मोर्शीत वेगवेगळ्या अपघातात महिला व युवकाचा मृत्यू

–दोन तासांच्या अंतरातील घटना
मोर्शी / 24 ऑगस्ट : आज रविवार, 24 ऑगस्ट रोजी मोर्शी तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. सकाळच्या सुमारास दापोरी गावातील सौ. पुष्पाताई अशोकराव डबरासे (वय 50) या महिलेला मोटारसायकल अपघातात जागीच प्राण गमवावे लागले, तर दुपारच्या सुमारास झालेल्या दुसर्या अपघातात महेश देविदास चरपे (वय 24, रा. वंडली मुळगावी, सध्या मुक्काम खंबीत बेलोरा) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सात वाजता अशोकराव डबरासे व त्यांची पत्नी सौ. पुष्पाताई या शेतातील कामे आटोपून परत दापोरी गावाकडे येत होत्या. त्यावेळी गावातील सार्वजनिक शौचालयाजवळ असलेला खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलचे संतुलन बिघडल्याने मागे बसलेल्या पुष्पाताई डबरासे या नालीमध्ये जोराने पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे नेण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, दुपारी बारा वाजताच्या सुमारास मोर्शी येथे दुसर्या अपघातात महेश देविदास चरपे हा युवक मृत्युमुखी पडला. आष्टी तालुक्यातील खंबीत बेलोरा येथे आपल्या मामाकडे राहणारा महेश हा काही कामानिमित्त मोर्शी येथे आला होता. मोर्शीतून कामे आटोपून बेलोरा येथे जात असताना समोरुन येणार्या मोटारसायकलची जोरदार धडक बसल्याने तो खाली पडला. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तातडीने उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सध्या आष्टी पोलीस करीत आहेत.




