चायनिज पदार्थ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

गाडगेनगरातील घटना

अमरावती / 9 जुलै: गाडगेनगर परिसरात पूनम फोटो स्टुडिओसमोर हातगाडीवर चायनिज पदार्थांचे दुकान लावणार्‍या एका युवकावर अज्ञात व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे परिसरता खळबळ उडाली होती. प्रफुल्ल हरीश तंतरपाळे (23, रा. भीमनगर, अमरावती) असे जखमी युवकाचे नाव आहे. उल्लेखनीय बाब अशी की, प्रफुल्ल तंतरपाळेवर यापूर्वी सात वेळा अशाच पद्धतीने हल्ले झाले आहे.
गाडगेनगर भागात मुख्य रस्त्याच्या कडेला सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चायनिज आणि अन्य खाद्यपदार्थांची अनेक दुकाने हातगाड्यांवर थाटली जाते. येथे महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे याठिकाणी सायंकाळी मोठी गर्दी असते. रस्त्यावरच गाड्यांचे पार्किंग केले जात असल्याने वाहतूकीसही अडथळा निर्माण होतो. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या अनधिकृत व्यवसायामुळे निर्माण झाला आहे.
या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावर अतिक्रमन करुन हातगाड्यांवर अनधिकृत व्यवसाय करणार्‍या या व्यावसायिकांवर कारवाई करावी आणि रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिस आणि अतिक्रमन विभागाने याबाबत गांभीर्याने पाउले उचलणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. प्रफुल्ल तंतरपाळेवरील हल्ल्यानंतर युवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविला असून तपासाला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button