देवरी येथे युवकावर सुर्‍याने प्राणघातक हल्ला

अचलपूर / 16 जुलै : घरासमोर गप्पागोष्टी करित बसलेल्या युवकामध्ये अचानक कोणत्यातरी कारणावरुन भांडण झाले आणि ते वाढत जावून दोघांनी एका 24 वर्षीय युवकावर सुर्‍याने प्राणघातक हल्ला करुन त्याला गंभीररीत्या जखमी केले. ही घटना समरसपूरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अचलपूर तालुक्यातील देवरी या गावात घडली. सुरज दीपक सोळंके असे जखमी युवकाचे नाव आहे.
सुरज देवरी येथे आपल्या घरासमोर शेजारी राहणार्‍या रितेश साबूलाल चतुर (24) आणि रमेश अमरलाल धाडसे (25) यांच्यासमवेत गोष्टी करित बसला होता. दरम्यान कोणत्यातरी क्षुल्लक कारणावरुन सुरजचे रितेश आणि रमेशसोबत भांडण झाले. ते विकोपाला जावून रितेशने हातातील सुर्‍याने सुरजच्या पोटावर वार केला. हा वार एवढा जबर होता की, सुरजच्या पोटातील आतडे बाहेर निघाले. गंभीर जखमी अवस्थेत सुरज सोळंके यांला अचलपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी सुरजचे वडिल दीपक सोळंके यांच्या तक्रारीवरुन दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button