वैष्णवी विहारमध्ये धाडसी घरफोडी

नांदगाव पेठ पोलिसठाण्यात तक्रार

अमरावती / 18 जानेवारी – अमरावती शहरालगत असलेल्या नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैष्णवी विहार वसाहतीमध्ये एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात सराईत चोरट्याने सुमारे 65 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराची मालकीण कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डल्ला मारला असून यामध्ये तीन तोळे वजनाच्या राणी हार या मौल्यवान दागिन्यासह इतर साहित्याचा समावेश आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध मोहीम तीव्र केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, वैष्णवी विहार येथील रहिवासी असलेली महिला आपल्या बहिणीच्या घरी आयोजित एका कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून अंजनगाव सुर्जी येथे गेली होती. दरम्यान, संबंधित महिलेची धाकटी बहीण याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर वास्तव्यास आहे. घराची देखरेख करत असताना तिला अचानक खालच्या मजल्या वरील दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केला असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले आणि कपाटातील मौल्यवान ऐवज गायब असल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच पीडित महिलेने तातडीने अंजनगाव सुर्जीहून परत येत नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठले. तक्रारीनुसार, चोरट्यांनी घरातील 3 तोळे सोन्याचा राणी हार आणि अन्य मुद्देमाल असा एकूण 65 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून परिसरातील संशयातिांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. वैष्णवी विहार परिसरातील या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे सावट आहे. सराईत चोरट्यांनी घराच्या कुलपाचा अंदाज घेऊन अत्यंत शिताफीने ही घरफोडी केली. ऐन सणासुदीच्या किंवा कार्यक्रमाच्या काळात बंद घरे लक्ष्य केली जात असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आता स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button