फळगळती व रोगराईने संत्रा पिकाचे कोट्यवधींचे नुकसान

वातावरणीय बदलांचा परिणाम, शेतकरी संकटात

-पंचनाम्यांचा आग्रह, आंदोलनाचा इशारा
कुर्‍हा / 17 ऑगस्ट : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर संकटातून जात आहेत. या वर्षी आंबिया बहराच्या संत्र्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता असतानाच मोठ्या प्रमाणात फळगळती व रोगराईच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. अलीकडील हवामानातील अस्थिरता संत्रा पिकावर प्रतिकूल परिणाम करत आहे. रात्रीच्या तापमानात झालेली वाढ आणि आर्द्रतेतील चढ-उतारामुळे फळगळती वाढत चालली आहे. झाडांच्या शरीररचनेतही बदल दिसून येत असून त्यामुळे फळ टिकाव धरू शकत नाहीत.
फायटोप्थोरा बुरशी, फांदीमर, डायबॅक अशा रोगांसोबत थ्रीप्स व कोळशीसारख्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परिणामी संत्रा झाडांची पाने पिवळी पडत आहेत, झाडे वाळत आहेत, तर फळे झाडावरच पिवळी होऊन गळून पडत आहेत. शेतकरी सतत फवारण्या करूनही त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. कृषी सेवा केंद्रातून महागडी बुरशीनाशके व कीटकनाशके विकत घेऊन शेतकरी फवारण्या करत आहेत. परंतु उत्पादन खर्च वाढत असूनही फायदा दिसत नाही. शेतकर्‍यांचे कंबरडे आधीच पेट्रोल-डिझेल, खतं, तणनाशकांवरील करवाढीमुळे मोडलेले आहे. मजूर टंचाईमुळे शेतीचे कामकाज सांभाळणे कठीण झाले आहे.
फळगळती, उत्पादन खर्च, बाजारभावाचा अभाव आणि कर्जबाजारीपणा यामुळे तिवसा तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक गावात आत्महत्यांच्या घटना नोंदवल्या जात आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ कृषीपुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर होत चालला आहे.
-शेतकर्‍यांची मागणी
कुर्‍हा येथील एकजूट शेतकरी संघटनेने शासनाकडे तातडीने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे 70 टक्क्यांहून अधिक संत्रा फळगळती होत असल्याने नुकसान भरपाई व शेतकर्‍यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे संघटनेचे मत आहे. पंचनामे न झाल्यास शेतकरी गावागावात मशाल रॅली, गावबंद, शेतमाल विक्री बहिष्कार अशा आंदोलनांचा मार्ग अवलंबतील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
-संशोधन संस्था झोपेत!
संत्रा संशोधन संस्था, कृषी विभाग अस्तित्वात असूनही शेतकर्‍यांना कोणतेही ठोस मार्गदर्शन मिळत नाही. महागडी औषधे घेऊन फवारणी करूनसुद्धा रिझल्ट नाही. मग संशोधन संस्थांचा उपयोग काय? असा संतप्त सवाल संत्रा उत्पादक शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button