आमदाराच्या दारात आज ‘डफली बजाओ’ आंदोलन
अतिवृष्टी मदतीपासून वंचित; हजारो शेतकरी आक्रमक

* आ.प्रवीण तायडे यांच्या कार्यालयावर धडकणार लोकविकास संघटना
अमरावती /13 जानेवारी : चांदूर बाजार तालुक्यातील तब्बल अकरा हजार शेतकरी अतिवृष्टीच्या शासकीय मदतीपासून वंचित राहिल्याने लोकविकास संघटनेच्या वतीने आमदार प्रवीण तायडे यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत, आज 14 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान आमदारांच्या संपर्क कार्यालयासमोर पुन्हा एकदा ’डफली बजाओ’ आंदोलन छेडण्याचा निर्धार शेतकर्यांनी केला आहे. हक्काच्या निधीसाठी दाद मागणार्या बळीराजाच्या भावनांची दखल घेण्याऐवजी त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने, आता शेतकरी वर्गाच्या संयमाचा बांध फुटला असून हे आंदोलन अधिक उग्र रूप धारण करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असतानाही शेतकर्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली होणार्या या आंदोलनातून सत्ताधार्यांच्या दुर्लक्षित धोरणांचा जाहीर निषेध केला जाणार आहे. मागील आंदोलनानंतर प्रशासनाने केवळ आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. उलटपक्षी, भरसभेत शेतकर्यांना मिळालेली वागणूक आणि शिवीगाळ यामुळे ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. केवळ राजकारण न करता शेतकर्यांच्या पदरात प्रत्यक्ष मदत पडावी, या मागणीसाठी शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी रस्त्यावर उतरणार असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच ठेवण्याचा पवित्रा संघटनेने घेतला आहे. सागर सवळे यांनी या संदर्भातील सविस्तर माहिती दिली असून, चांदूर बाजार परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या रणसंग्रामात सहभागी होणार आहेत.
अकरा हजार शेतकर्यांचे भविष्य टांगणीला -अतिवृष्टीचा निधी मिळवून देण्यात स्थानिक आमदार सपशेल अपयशी ठरले असून, शासन दरबारी पाठपुरावा करण्याऐवजी शेतकर्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून बळीराजाची फसवणूक केली जात असल्याने, आता लोकविकास संघटना आणि वंचित शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या न्याय्य हक्कांसाठी आरपारची लढाई लढणार आहेत.




