शासन आदेशाची अंत्ययात्रा काढणार्‍या शिक्षकांवर गुन्हे

प्रहार शिक्षक संघटनेचे आंदोलन

अमरावती / 20 जून: प्रहार शिक्षक संघटनेच्या बेमुदत उपोषण आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी शासनाच्या संच मान्यता आदेशाची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या आंदोलनात सहभागी झालेल्या राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांच्यासह अकरा आंदोलनकर्त्या शिक्षकांवर गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. आंदोलनकर्त्या शिक्षकांनी यावेळी घोषणा देत शासनाचा निषेध केला होता. प्रशासनाने आंदोलनाची दाखल न घेतल्याने प्रहार शिक्षक संघटना कमालीची आक्रमक झाली असून कार्यवाही होत नसल्याने अखेर संघटनेने संच मान्यतेच्या शासन आदेशाची अंत्ययात्रा काढल्याचे या शिक्षकांचे म्हणणे होते.
मात्र आंदोलन करताना प्रेतयात्रा काढण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने गैरकायदेशीररीत्या जमाव गोळा केला गेला, असा ठपका ठेवून बारा शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांचासह कुलदिप ढंबारे, शरद काळे, अमोल आगे, अमोल गोपाल, अमोल वरेकर, किशोर मालदिव, दिलीप दंगळे, नागसेन रामटेके, ज्योतीराम थोरात, अनिल कोल्हे, सुरेश किंमतकर यांचा समावेश आहे. आंदोलनावेळी पोलिसांनी या शिक्षकांना ताब्यात घेउन स्थानबद्ध केले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रहार शिक्षक संघटनेचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयावर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे. ग्रामीण शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारा व शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारा संच मान्यता दिनांक 15 मार्च 2024 चा शासन निर्णय तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसह एकूण 35 मागण्या शिक्षक संघटनेने केल्या आहेत. आंदोलनकर्त्या शिक्षकांनी रक्तदान करून शासनाचा व प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Back to top button