बनावट नोटा रॅकेटचा भंडाफोड, आरोपीस अटक

चार वर्षांपासून सुरू होता गोरखधंदा

* नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई

अमरावती / 8 जानेवारी वेब सीरिजचा आधार घेत 500 रुपयांच्या हुबेहूब नकली नोटा छापणार्‍या एका 26 वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळण्यात अमरावती पोलिसांना यश आले आहे. सुफियान नगर येथील रहिवासी अब्दुल तौसीफ अब्दुल करीम असे या आरोपीचे नाव असून, तो अवघ्या काही मिनिटांत कलर प्रिंटर, ट्रेसिंग पेपर आणि साध्या चमकीचा वापर करून बनावट चलन तयार करत होता.
मागील चार वर्षांपासून हा अवैध व्यवसाय सुरू असून यापूर्वी नागपुरातही त्याला अशाच गुन्ह्यात अटक झाली होती. नांदगाव पेठचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई करून लाखो रुपयांच्या नोटांसह मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अब्दुल तौसीफने आपल्या घरातच एक स्वतंत्र खोली या कामासाठी राखून ठेवली होती. तिथे तो खर्‍या नोटांचे स्कॅनिंग करून ट्रेसिंग पेपरवर दोन्ही बाजूंनी प्रिंट काढत असे. त्यानंतर बॉन्ड पेपर आणि ट्रेसिंग पेपरच्या मधोमध सिक्युरिटी थ्रेड म्हणून सजावटीच्या हिरव्या चमकीचा अतिशय चलाखीने वापर केला जात होता. सर्वसामान्य नागरिकांना त्यातील फरक ओळखणे कठीण होत असे. या बनावट नोटा बाजारात चलनात आणण्यासाठी आरोपीने एक मोठे रॅकेट तयार केले होते, ज्यामध्ये सामील असलेल्यांना बदल्यात दुप्पट नोटांचे आमिष दाखवले जात असे उघडकीस आले आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 178 ते 182 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. दिलीप तिवारी यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button