चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत सोहळा

भव्य परेड व साहसी प्रात्यक्षिकांची सादरीकरण

-प्रशिक्षणार्थ्यांचा आत्मविश्वास आणि समर्पण झळकले
चिखलदरा /29 सटेंबर : वनसंपदेचं रक्षण, पर्यावरणाचं संवर्धन आणि निसर्गाची सुरक्षा यासाठी वनसेवेच्या नव्या पिढीने आज शपथ सोहळ्यात वनसैनिकाच्या पावलांतून वनसेवेची नवी पहाट उजाडली आहे. वन प्रशिक्षण संस्थेत दिमाखात पार पडला 62 वा पासिंग आऊट कार्यक्रम थाटात पार पडला. नवे वनसैनिक निसर्गरक्षणासाठी सज्ज झाले असून शिस्तबद्ध पावलांनी परेड मैदान परिसर दुमदुमला.
चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेत आयोजित वनरक्षक यांच्या पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सत्र क्रमांक 62 च्या दीक्षांत सोहळ्याला अभूतपूर्व उत्साह लाभला. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांना प्रेरणादायी अनुभव दिला. वनरक्षकाची कर्तव्य काय आहेत? खरा वनरक्षक कोण असतो? या प्रश्नाला भिडत, वनरक्षकांची कर्तव्ये, जबाबदार्‍या व गणवेशाचे महत्व यावर मार्मिक विचार मांडले. वनरक्षक हा फक्त जंगलाचा पहारेकरी नसून, तो प्रकृतीचा रक्षक, वन्यजीवांचा संरक्षक आणि पर्यावरणाचा खरा सेवक आहे, असे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) संजीव गौड यांनी केले.यावेळी मार्गदर्शन करतांना गौड यांनी गणवेशाचे महत्त्व नमूद करत भावी वनरक्षकांना कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या दीर्घ वनसेवा अनुभवातून त्यांनी प्रशिक्षणार्थींना अनेक मार्गदर्शक उदाहरणे दिली. कर्तव्य कठीण असले तरी त्यात समाधान अधिक आहे, असे सांगत त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सेवा, शिस्त आणि समर्पणाचे बीज पेरले. सोहळ्याला गुगामलच्या उपवनसंरक्षक किर्ती जमदाडे, अमरावतीचे उपवनसंरक्षक के. अर्जुना, सी. गणेशन, एसएनडीटी महिला विद्यापीठचे डॉ. इंगोले आदींचे समायोचित मार्गदर्शन केले. सोहळ्याची सुरुवात प्रशिक्षणार्थी वनरक्षकांच्या भव्य परेडने झाली. अंगावर रोमांच उभे करणार्‍या या परेडनंतर, अध्यक्ष संजीव गौड यांना प्लाटून कमांडर सागर मुकणे यांनी सैनिकी मानवंदना देण्यात आली. यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी साहसी प्रात्यक्षिके सादर करत आपल्या कौशल्याची उत्तम झलक दाखवली. संस्थेच्या संचालक मुक्ता टेकाळे यांनी अहवाल वाचन आणि प्रास्तविक केले. सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला. प्रशिक्षण कार्यक्रमात रोहित माळी, संकल्प जाधव, महेश बगाड हे पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले. 5 किमी धावण्याच्या स्पर्धेत पुरुष गटात राजू धनवई तर वंदना रहेरे हिने महिला गटात अव्वल क्रमांक पटकावला. तर नितीन गावित यांची आदर्श प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन पूजा बेंडकोडी तर आभार कवायत शिक्षक सुधीर आक्केवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी संस्थेतील अधिकारी, प्रशिक्षक, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती. संस्थेतील निसर्गरम्य परिसरात पार पडलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनात प्रेरणेचा नवा सुस्कार घेऊन गेला. चिखलदरा वन प्रशिक्षण संस्था ही केवळ प्रशिक्षण केंद्र नाही, तर ती भविष्याचे जबाबदार वनरक्षक घडवणारी गुरुकुलसदृश संस्था आहे, हे या सोहळ्याने पुन्हा एकदा अधोरेखित केले. सोहळ्याच्या आयोजनासाठी संस्थेचे संचालक, उपसंचालक, वनपाल, वनरक्षक, कवायत शिक्षक व इतर सर्व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.

कुटुंबीयांच्याही डोळ्यांत दाटून आला अभिमान
चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेच्या परेड मैदानावर 62 व्या बॅचचा भव्य पासिंग आऊट समारंभ दिमाखात पार पडला. वन सेवेचा संकल्प घेणार्‍या नव्या जवानांच्या शिस्तबद्ध पावलांनी सारा परिसर दुमदुमून गेला. मुख्य अतिथींच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम अतिशय देखणा व प्रेरणादायी ठरला. परेड मैदानावर वन संरक्षण, शिस्त, धैर्य आणि देशभक्तीचे अनोखे दर्शन घडले. वन सैनिकांच्या पावलांतील ताळमेळ, डोळ्यांतली चमक आणि ताठ उभे राहण्याची शैली पाहून उपस्थित मान्यवरांसह कुटुंबीयांच्याही डोळ्यांत अभिमान दाटून आला. परेड मैदानाच्या कडेने उभे असलेले आई-वडील, पत्नी, भावंडे आपल्या लेकराकडे कौतुकाने व अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत होते.

संबंधित बातम्या

Back to top button