तिवसा तहसीलवर काँग्रेसचे शिदोरी आंदोलन
सरकार विरोधात घोषणा : तहसीलदार यांना निवेदन

तिवसा /17 ऑक्टोबर : राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली असून, शेतकऱ्यांची ही दिवाळी अंधारात जाणार आहे. नुकसानीच्या मदतीतून जिल्हा वगळण्यात आल्याने आज काँग्रेससह शेकडो शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयाच्या परिसरात शिदोरी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या. आपल्या संपूर्ण मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार यांना देण्यात आले. माहे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 दरम्यान तिवसा तालुक्यातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेली मदत अत्यल्प असून, राज्य सरकारने ज्या घोषणा केल्या त्या घोषणांच्या विपरीत नुकसानभरपाई मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्यातही तिवसा तालुका हा 60% नुकसानग्रस्त दाखवण्यात आला असून काही मंडळे सुटल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. सरसकट नुकसान झाले असतानाही ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती असूनसुद्धा नदीकाठच्या शेती खरडून गेलेल्या शेतकऱ्यांनाही कुठलीच नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. सोयाबीन, कपाशी, तूर व संत्रा या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण झाले नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळेल का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून राजकीय घोषणेमुळे शेतकरी संभ्रमात आहे. शासन निर्णयानुसार 8 ऑक्टोबरच्या शासन निर्णयात तिवसा तालुका वगळण्यात आला होता; परंतु 15 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयात अमरावती जिल्हाच वगळण्यात आल्याने सरकारची ही मदत शेतकऱ्यांना मिळणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात शासन निर्णयाची होळी करून काळे झेंडे आणि काळ्या फिती बांधून, शिदोरी चटणी-भाकर खाऊन तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. या वेळी तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यात नुकसानीची आकडेवारी पाहता तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या अहवालामध्ये तालुक्याला 48 कोटी 64 लाख 48 हजार रुपयाची सरसकट मदत जिरायती बागायती व फळ पिकांना व नदीकाठची शेती खरडून गेलेल्या शेतकर्यांना तातडीने मदत मिळावी. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना त्याला सरसकट नुकसान भरपाई मिळने अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही लवकरच नुकसान भरपाई मिळाली नाही याही पेक्षा तीव्र आंदोलन करू.
-वैभव वानखडे, तालुका अध्यक्ष कॉग्रेस.




