काँग्रेस नेते बाळासाहेब हिंगणीकर भाजपच्या वाटेवर!

अमरावती /23 जानेवारी : दर्यापूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर – गावंडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील स्थानिक नेत्यांकडून होणारी दुर्लक्षता आणि गटबाजीला कंटाळून हिंगणीकर आता भाजपचा झेंडा हाती घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. एकेकाळी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे हिंगणीकर आता त्यांच्याच साथीने नवा राजकीय प्रवास सुरू करण्याची शक्यता असून, हा बदल काँग्रेससाठी दर्यापूर गडात मोठा धक्का मानला जात आहे. बाळासाहेब हिंगणीकर यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये निष्ठेने काम करून पक्ष संघटना मजबूत केली. मात्र, गेल्या काही काळापासून तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्याशी असलेले मतभेद आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्याशी तुटलेला संपर्क यामुळे ते पक्षात एकाकी पडले होते. नगरपालिका निवडणुकीतही त्यांनी पक्षाच्या कामातून काढलेली माघार त्यांची नाराजी स्पष्ट करणारी होती. मला विश्वासात न घेता अनेक कार्यक्रमांत डावलले गेले, त्यामुळेच मी पक्ष सोडत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. हिंगणीकर यांच्या या निर्णयामुळे त्यांच्यासोबत मोठा कार्यकर्ता वर्गही भाजपमध्ये जाण्याची चिन्हे आहेत.

नाराजीचे नेमके मूळ?

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि ज्येष्ठ नेत्यांना मिळणारी दुय्यम वागणूक यामुळे बाळासाहेब हिंगणीकर व्यथित होते. तालुका पातळीवरील नेतृत्वाशी असलेले वाद आणि वरिष्ठ नेत्यांशी संवाद नसल्याने त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचे पाऊल उचलले आहे. प्रकाश भारसाकळे यांच्याशी वाढलेली जवळीक ही दर्यापूरच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button