चांदूर रेल्वे शहरात पाणीपुरवठा समस्येवर काँग्रेसचा हल्लाबोल
7 दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे आंदोलन, काँग्रेसचा इशारा

चांदूर रेल्वे/29 ऑक्टोबर : गेल्या वर्षभरापासून चांदूर रेल्वे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये चार-पाच दिवसांनी एकदाच नळ येतो, तोही अत्यंत कमी दाबाने.महिला, वृद्ध आणि लहान मुलांना पाण्याच्या एका बादलीसाठीही रांगेत उभे राहावे लागत आहे. काही भागात नागरिकांना विहिरी आणि खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीबाबत अनेकदा नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
प्रशासनाची निष्क्रियता, मनमानी आणि जनतेप्रती असंवेदनशील वागणूक यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कार्यालयावर जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शहरातील नागरिक, महिला, युवक, आघाडीचे कार्यकर्ते आणि काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नगरपरिषद गाठली आणि पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी 7 दिवसांच्या आत समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तथापि, काँग्रेस कमिटीने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर सात दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन छेडले जाईल, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. या आंदोलनाचे नेतृत्व शहर काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकार्यांनी केले. नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी काँग्रेसने घेतलेला हा ठाम पवित्रा प्रशासनासाठी इशारादायक ठरला असून जनतेचा आवाज बुलंद करणारे हे आंदोलन ठरले आहे. यामध्ये परीक्षित जगताप प्रदेश महासचिव युवक काँग्रेस, शिट्टुदादा सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष, प्रभाकरराव वाघ माजी नगराध्यक्ष, अमोल होले तालुकाध्यक्ष,श्रीनिवास सूर्यवंशी शहराध्यक्ष, हर्षल वाघ, रुपेश पुडके, देवानंद खुणे, प्रफुल कोकाटे, कल्पनाताई लांजेवार, सीमाताई कलावटे,पूजाताई वाघ, राजश्रीताई माने, शेख रिजवाना, अजय भाऊ होटे, सारंग देशमुख, सागर बोंडे, राजेश बनसोड, अनिल वगैरे, सनी सावंत, महेश कलावटे, पंकज मेश्राम, सतीश देशमुख, संदीप शेंडे, भीमराव खराटे, राजूभाऊ लांजावार, अनिश भाऊ सौदागर, सुमित सरदार, प्रतीक भैसे, सतपाल वरठे सक्षम वानखडे, शरद घासले, रमेश गिरवळकर, अनिल फरकाडे, संजय कोल्हे, विलास मोटघरे, नरेंद्र मेश्राम, गोपाल अविनाश, राहुल राऊत, भीमराव पवार, करण मेश्राम, इत्यादी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते




