शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत संभ्रमावस्था

रोज एक नवीन अडथळा

-मुदत 13 मेलाच संपली
अमरावती / 6 जून: गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेत रोज एक नवीन अडथळा निर्माण होत असून शासन निर्णयानुसार 31 मे रोजी बदलीची मुदत संपल्यामुळे शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार की नाही, असा संभ्रम शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे. ग्राम विकास विभागाच्या 18 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार, एकूण 7 टप्प्यात शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 7 नोव्हेंबर 2024 रोजी ग्राम विकास विभागाकडून 28 एप्रिल ते 31 मे असे प्रत्यक्ष बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु पुढे या वेळापत्रकात वारंवार बदल करण्यात आला.
ऑनलाईन प्रक्रियेत वारंवार निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी, शिक्षक व शिक्षक संघटना यांनी दाखल केलेली न्यायालयीन प्रकरणे व त्याबाबत उच्च न्यायालयाने पारित केलेले आदेश, तसेच जुन्या-नव्या संच मान्यतेबाबतचा संभ्रम या सर्व बाबींमुळे शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेत सातत्याने अडथळे निर्माण झाल्याने अजूनही संवर्गनिहाय प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरुवात होऊ शकली नाही. 7 नोव्हेंबर 2024 च्या वेळापत्रकानुसार संपूर्ण बदली प्रक्रियेसाठी 34 दिवसाचा कालावधी लागणार होता. हे वेळापत्रक गृहित धरले तर आज जरी प्रक्रिया सुरू झाली तरी बदली प्रक्रिया पूर्ण व्हायला जुलै उजाडेल.
विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा 16 जून रोजी तर विदर्भातील शाळा 23 जून रोजी सुरू होणार आहे, त्यामुळेच आता शाळा सुरू होण्याआधी बदली प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे बदल्या होणार की नाही, याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे. सध्या बदली बाबतच्या याद्या प्रसिध्द झाल्या आहे. पण रिक्त जागा घोषित झाल्या नाहीत. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. प्रशासकीय व तांत्रिक अडचणी आणि न्यायालयीन प्रकरणे यामुळे बदली प्रक्रिया लांबल्याचे मानले जात आहे, तरी वारंवार बदलणारे निकष, शिक्षण व ग्राम विकास विभागातील असमन्वय आणि प्रशासकीय उदासीनता याबाबी सुद्धा बदली प्रक्रिया लांबण्यासाठी कारणीभूत ठरत असाव्यात, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. शासनाच्या हेतूवरच शिक्षकांकडून शंका निर्माण होऊ लागली आहे. शासनाने बदली प्रक्रिया सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावकर यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button