प्रभाग रचनेतील गोंधळ : मतदारांमध्ये संभ्रम वाढला
काही वसाहतींचा उल्लेखच नाही

-आक्षेप-आपत्त्यांची संख्या वाढणार!
अमरावती / 10 सप्टेंबर : अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचा विचार करून महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यानुसार 22 प्रभाग निश्चित करण्यात आले असून, सदस्यसंख्या 87 इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र, नव्या रचनेत अनेक निवासी वसाहती, कॉलनी व बस्त्यांचा उल्लेखच नसल्याने संबंधित भागातील मतदारांसह निवडणूक लढण्याची इच्छा असलेले संभाव्य उमेदवारही संभ्रमात सापडले आहेत.
वर्ष 2017 च्या प्रभाग रचनेतील यादीत मनपा क्षेत्रातील प्रत्येक वसाहतीचा स्पष्ट उल्लेख होता. पण 2025 च्या नव्या यादीत अनेक मोठ्या मतदारसंख्या असलेल्या भागांची नावेच नाहीत. परिणामी, संबंधित भागातील मतदारांना आपला प्रभाग कोणता याचा पत्ता नाही. सध्या जाहीर करण्यात आलेल्या या मसुद्यावर आक्षेप व आपत्ती नोंदविण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर आक्षेप व आपत्ती नोंद होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग व मनपा आयुक्त यांनी तयार केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला यामुळे प्रश्नचिन्ह लागले असून, गोंधळाची स्थिती दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने स्पष्टता करणे आवश्यक आहे, अशी मागणी व्यक्त केली जात आहे.
-किरणनगर, जलारामनगर, मोतीनगर गायब
जाहीर झालेल्या प्रभागनिहाय यादीत रुक्मिणीनगर परिसराचा समावेश स्वामी विवेकानंद प्रभागातून काढून फ्रेजरपुरा प्रभागासोबत जोडला गेला आहे. स्वामी विवेकानंद प्रभाग स्वतंत्र ठेवण्यात आला असला तरी या बदल्यात जुन्या प्रभागांतील अनेक वसाहतींचे ‘इथून तिथे’ स्थलांतर करण्यात आले. पण किरणनगर, मोतिनगर, भगवाननगर, डहाणेनगर, जलारामनगर अशा महत्त्वाच्या वसाहतींचा उल्लेख कोणत्याही प्रभागात नाही. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम पसरला आहे.




