कामगारांना संच वाटपात गोंधळ, बच्चू कडू संतापले

खास शैलीत इलाज करण्याचा इशारा

-लाभार्थींना 16 तास रांगेत उभं ठेवलं
-कंत्राटदारावर गंभीर आरोप
अमरावती / 11 सप्टेंबर : शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी असलेल्या गृहपयोगी संच वाटप योजनेत अमानवी गैरव्यवस्थापनाचा भंडाफोड झाला आहे. संच मिळवण्यासाठी जिल्हाभरातील हजारो कामगारांना तब्बल 16 तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे कामगारांना केवळ आर्थिकच नाही, तर मानसिक छळही सहन करावा लागत आहे. कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी करताना केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही प्रत्यक्षात केवळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा येथेच वाटप सुरू असल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
या गोंधळावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील इतर तीन वितरण केंद्रे तातडीने सुरू झाली पाहिजेत. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने वितरण मार्गी लावू, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदनही दिले असून, कामगारांना एकाच ठिकाणी बोलावणे अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. तत्काळ तोडगा न निघाल्यास आंदोलन करू, त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
दाभा केंद्रावर 3 आणि 4 सप्टेंबरला संच न मिळालेल्या कामगारांसह 8 सप्टेंबर रोजी नोंदणी केलेले कामगार मोठ्या संख्येने येथे जमा झाले होते. परिणामी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि प्रशासनाला मोठा पोलीस बंदोबस्त लावावा लागला. दरम्यान, या वाटपाचे कंत्राट एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले असून, तो राज्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याचा जवळचा असल्याचा आरोप होत आहे. यापूर्वीच्या कामात तोटा झाल्याने पुन्हा त्याच कंत्राटदाराला काम देण्यात आले, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संचाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तसेच, एकाच केंद्रावर वाटप करून खर्च वाचवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा कामगारांमध्ये रंगली आहे.
कामगार संघटनांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारने तालुका स्तरावरच संच वितरणाची व्यवस्था करून कामगारांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. एकूणच, शासनाच्या तथाकथित कामगारहितकारी योजनेचे रूपांतर गोंधळ आणि त्रासात कारंज्यात झाले असून, कामगारांच्या सहनशीलतेचा अंत आता समीप दिसत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button