अमरावतीच्या राजकीय वर्तुळातून शोककळा

शहरातील मान्यवरांच्या शोकसंवेदना

अमरावती/28 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील भीषण निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यातही शोककळा पसरली आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या एका कणखर नेतृत्वाचा असा अकाली अंत झाल्याने राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना विविध पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनावरील मजबूत पकड असलेला नेता हरपला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. गणेशराव खारकर यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले की, अजितदादांच्या निधनाने सत्तेच्या केंद्रातील एका प्रभावशाली प्रवासाचा अंत झाला आहे. ते अजातशत्रू आणि सर्वांचे लाडके नेते होते. त्यांची दूरदृष्टी, स्पष्ट व्हिजन आणि कामाचा उरक ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी वैशिष्ट्ये होती. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही. डॉ. खारकर आपल्या कार्यकर्त्यांसह अंत्यदर्शनासाठी बारामतीकडे रवाना झाले आहेत.

जनहितार्थ समर्पित जीवन संपले

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, एक अनुभवी आणि दूरदर्शी नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. लोकशाही मूल्ये आणि प्रशासकीय संतुलनासाठी अजितदादांनी घेतलेली भूमिका सदैव स्मरणीय राहील. जनसेवेची त्यांची भावना येणार्‍या पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल.

महाराष्ट्राचा धधकता टॅाक शांत झाला

राजकीय विश्लेषक व सामाजिक कार्यकर्ते गुणवंत देवपारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, प्रशासनावरील पकड आणि अहोरात्र काम करण्याची जिद्द यामुळे अजितदादांनी जनमानसात स्थान निर्माण केले होते. आज बारामतीत झालेल्या या दुर्घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धधकता टॅाक शांत झाला आहे. त्यांचा बुलंद आवाज आता कायमचा स्मृतींत राहील.

महाराष्ट्राची संपूर्ण माहिती असणारा नेता हरवला

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍याची खडान् खडा माहिती असणारे, सामान्यांचे लोकनेते आज आपल्यात नाहीत. आपल्या बेधडक आणि निर्भीक स्वभावासाठी ओळखले जाणारे अजित दादा महाराष्ट्राची शान होते. एक पत्रकार म्हणून पत्रकारांच्या समस्यांबाबत मला त्यांच्याशी तीन वेळा संवाद साधण्याची संधी मिळाली. वरून कठोर वाटणारे दादा मनातून अत्यंत हळवे, संवेदनशील आणि माणुसकी जपणारे होते. मंत्रालयातील प्रत्येक विभागाची सखोल माहिती असणारे दादा कार्यकर्त्यांशी मनापासून जोडलेले नेतृत्व होते. त्यांचे जाणे ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची कधीही भरून न निघणारी हानी आहे.

महाराष्ट्राचा नेता हरपला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रशासकीय कामाचा उरका आणि गोरगरीब जनतेच्या विकासाची ओढ असलेला हा नेता आज आपल्यात नाही, हे मनाला पटत नाही. प्रशासनावरील पकड आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची ओळख सर्वांनाच माहित आहे.
लोकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची ती धडाडी आणि कामाचा वेग कमालीचा होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परखड तसेच प्रभावी व्यक्तिमत्त्व हरवले आहे. या कठीण प्रसंगी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अमरावतीकर पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.

धाडसी आणि निर्भीड नेतृत्व हरपले

भाजप नेते सुनील खराटे यांनी अजितदादांच्या कार्यशैलीचा गौरव करताना सांगितले की, अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षमतेत ठाम असलेले नेते होते. शेतकरी, कष्टकरी आणि युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती कशीही असो, निर्णय घेण्याचे धाडस त्यांच्यात होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button