विकासकामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करा
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे निर्देश

* आयुक्त यांची निंभोरा फायर स्टेशन, नगरोत्थान रस्ते व सावता मैदान सांस्कृतिक भवन कामांची पाहणी
अमरावती /30 सटेंबर : अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी निंभोरा येथे सुरु असलेल्या फायर स्टेशनच्या बांधकाम स्थळाची पाहणी करून संबंधित अधिकार्यांशी सविस्तर चर्चा केली. काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी आवश्यक त्या सूचना आयुक्त महोदयांनी दिल्या. त्यानंतर आयुक्तांनी नगरोत्थान योजनेतर्गत सुरु असलेल्या बारीपुरा ते गांधीनगर रेल्वे क्रॉसिंग जुनीवस्ती रोड तसेच होलीक्रॉस नवी वस्ती रोड येथील रस्त्यांची पाहणी केली. नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यांची गुणवत्ता उत्तम राखावी व काम नियोजनबद्ध गतीने पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
याचप्रमाणे सावता मैदान येथे सुरु असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या बांधकाम प्रकल्पालाही आयुक्तांनी भेट दिली. या ठिकाणी चालू असलेल्या कामकाजाची प्रगती पाहून बांधकाम अधिक मजबूत, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण राहावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांमुळे संबंधित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निंभोरा फायर स्टेशन, नगरोत्थान योजनेतील रस्ते व सावता मैदान सांस्कृतिक भवन या विविध विकासकामांची पाहणी करताना संबंधित अधिकार्यांना स्पष्ट व काटेकोर सूचना दिल्या. प्रत्येक काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, सर्व विकासकामांची गुणवत्ता उत्तम राखावी व नागरिकांच्या सोयीला प्राधान्य द्यावे, असे आयुक्तांनी सांगितले.
फायर स्टेशनचे बांधकाम मजबूत, सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या योग्य असावे. नगरोत्थान अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांचे काम जलद गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे. सावता मैदान सांस्कृतिक भवन प्रकल्पात बांधकामाची गुणवत्ता व सुरक्षिततेवर विशेष भर द्यावा. कामामध्ये कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, नियमित तपासणी व आढावा घेतला जावा. आयुक्तांनी दिलेल्या या निर्देशांमुळे महत्वाच्या विकासकामांना गती मिळून नागरिकांना सुविधा वेळेत उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या पाहणीदरम्यान महापालिकेचे संबंधित विभाग प्रमुख शहर अभियंता रविंद्र पवार, मुख्य अग्निशमन प्रमुख लक्ष्मण पावडे, अग्निशमन अधिक्षक संतोष केंद्रे, उपअभियंता श्रीरंग तायडे, अभियंता राजेश आगरकर, आर.आर. तांबेकर, सहाय्यक चेतन तांबेकर, अमीन नूर आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते.




