आले रे आले गणपती बाप्पा आले…जयघोषात शहर दुमदुमले
घराघरांत बाप्पाची स्थापना, पारंपरिक वेशभूषेत भक्तगण

-वारकरी दिंड्या-नृत्यांनी सोहळ्याला अविस्मरणीय रंग
-मातृशक्तीचा ठसा, आनंद-उत्साहात अमरावतीकर
अमरावती / 27 ऑगस्ट : आले रे आले गणपती बाप्पा आले… असा गजर करत संपूर्ण शहर- जिल्हा आज बाप्पामय झाला. घराघरांत, मंडपामंडपांत, रस्त्यारस्त्यावर गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर, थिरकणारे भक्त आणि गगनभेदी बाप्पा मोरयाच्या जयघोषाने गणरायाचा भव्य, आनंदमय आगमन सोहळा उत्साहाने पार पडला.
यंदाचा गणेशोत्सव 11 दिवसांचा मंगलप्रसंगी ठरणार असल्याने सर्वत्र शुभ-शुभतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी बालगोपाळांपासून तर तरुणाई, महिला मंडळींपर्यंत सर्वच वर्ग उत्साहाने झोकून देताना दिसले. नीलकंठ व्यायामशाळा, आजाद हिंद मंडळ, लक्ष्मीकांत मंडळ, सराफा व्यापारी असो, की परकोटातील इतर मंडळे, सर्वत्र शोभायात्रांना अप्रतिम प्रतिसाद मिळाला. आजाद हिंद मंडळाच्या शोभायात्रेत स्त्रियांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लेझीम व इतर नृत्यप्रकार सादर करत बाप्पाच्या स्वागताला अनोखा रंग भरला. 21 व्या शतकात सर्व क्षेत्रांत कंध्याला खांदा लावून काम करणार्या महिलांनी गणेशोत्सवही आपला ठसा उमटवत रंगतदार केला.
अनेकांनी पगडी बांधून, पारंपरिक पोशाखांत बाप्पाला घरी आणले. महिलांनी झरीच्या साड्या नेसून झांज, मंजीरे, शंखनादाच्या गजरात आरती केली. वारकरी संप्रदायाच्या पथकांनी काढलेल्या रिंगण-दिंड्यांनी वारकरी परंपरेची झलक दाखवली. न्यू आजाद मंडळात दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विदर्भाचा राजा’ राजमहलात विराजमान झाला आहे. दर्शनार्थ भाविकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून, 1001 किलो मोतीचूर लाडूचा महाप्रसाद अर्पण होणार आहे. दुसरीकडे नीलकंठ मंडळात विठ्ठल-रुक्मिणीच्या झांकीने श्रद्धाळूंना वारकरी संस्कृतीचा अनुभव मिळत आहे.
राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, शिवसेनेच्या प्रीती बंड, आमदार प्रवीण तायडे, आमदार प्रताप अडसड यांच्यासह अनेक मान्यवरांच्या निवासस्थानीही गाजावाजा करत गणेशप्रतिमा स्थापित करण्यात आल्या. माथ्यावर बाप्पा मोरयाच्या पट्ट्या, हातात गुलाल, ओठांवर गजर आणि पावलांत ढोल-ताशांची लय… अशा अविस्मरणीय उत्साहाने अमरावतीकरांनी गणरायाचे स्वागत केले. 10 दिवसांच्या या उत्सवात भक्तिभाव, रंगत, आणि लोकपरंपरेची झलक अनुभवण्यास मिळणार आहे.




