आ. तायडेंची बदनामी करणारे 4 प्रहार कार्यकर्ते अडचणीत
बनावट दस्तावेज, जनतेची दिशाभूल

-चांदुर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल
अचलपुर / 1 सप्टेंबर : भाजपचे आमदार प्रवीण तायडे आणि प्रहार जनशक्ति पक्षाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. बच्चू कडू यांच्या पाठिशी उभ्या असलेल्या चार प्रहार कार्यकर्त्यांविरुद्ध चांदुर बाजार पोलिसांनी सोशल मीडिया आणि सार्वजनिक मंचावर आमदार तायडेबद्दल खोटी माहिती पसरवून बदनामी केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ऋषिकांत श्रीवास (प्रल्हादपूर), प्रदीप बंड (जसापुर), प्रसन्न अढाव (टोपे नगर) आणि सुरेश गणेशकर (करजगांव) यांच्या विरोधात बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भाजप आमदार प्रविण तायडे आणि बच्चू कडू यांच्यात निवडणूक क्षेत्रातील निधीच्या वापराबाबत वाद सुरू आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार तायडे यांच्या वतीने आरोप करण्यात आला की, अचलपुर क्षेत्राचा 10 कोटी रुपयांचा निधी वरुड व मोर्शी पालिकेसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान या प्रहार कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आमदार तायडे विरुद्ध बनावट दस्तावेजांचा वापर करून खोटी माहिती पसरवली, सार्वजनिक प्रतिमेला धक्का दिला आणि जात्यावर षडयंत्र रचले, असा आरोप तायडे यांच्या वतीने झालेल्या तक्रारीत नमूद आहे. यात बीएनएसची धारा 318 (1), 318 (4), 336 (3), 336 (4), 340 (2), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनांमुळे तायडे-कडू वादाची धार अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होत असून, स्थानिक राजकारणात प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस व तपास यंत्रणा या आरोपांचा तपास करत आहेत.




