अमरावती कारागृहात दोन गटांत हाणामारी, नऊ कैद्यांवर गुन्हा

कैद्यांचा संताप उफाळला; कारागृहात काही क्षणांत पेटली दंगल

अमरावती /10 नोव्हेंबर – अमरावती मध्यवर्ती कारागृहात रविवारी (दि. 9 नोव्हेंबर) रात्री भीषण गदारोळ उडाला. न्यू बॅरक क्रमांक 13 मध्ये न्यायाधीन कैद्यांच्या दोन गटांमध्ये उसळलेल्या हाणामारीने काही क्षणांतच कारागृह रणांगण बनले. कैद्यांनी एकमेकांवर झडप घालत निर्दयपणे मारहाण केली, तर काहींनी बॅरकमधील वस्तू फेकून चक्क तोडफोड माजवली.
अचानक पेटलेल्या या हिंसक संघर्षामुळे काही वेळासाठी कारागृहात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर ड्युटीवरील कर्मचारी श्रीकृष्ण लांजेवार यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तातडीने आपल्या सहकार्‍यांना आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली. काही मिनिटांतच जवान अनिल फुफरे, अक्षय गायकवाड, आशीष घोडेस्वार यांसह अतिरिक्त कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पोहोचले. त्यावेळी दोन्ही गटातील कैदी संतप्त अवस्थेत एकमेकांवर तुटून पडले होते. जवानांनी जीवाची पर्वा न करता दोन्ही बाजूंच्या कैद्यांना वेगळे करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. गोंधळ शांत झाल्यानंतर संबंधित कैद्यांना तात्काळ स्वतंत्र बॅरकमध्ये हलवण्यात आले, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचा संघर्ष होऊ नये. काही कैद्यांनी बॅरकमधील लोखंडी सळ्या, बादल्या व इतर वस्तू शस्त्रासारख्या वापरल्याचेही सूत्रांकडून समजते. सुदैवाने यात कोणतीही गंभीर जखमीची नोंद नसली, तरी वातावरण दीर्घकाळ तणावपूर्ण राहिले. घटनेनंतर कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या निर्देशानुसार सुबेदार कृष्ण लांजेवार यांनी रात्री उशिरा फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी नऊ न्यायाधीन कैद्यांविरुद्ध परस्पर मारहाण, कारागृहातील शिस्तभंग व सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी बीएनएस कलम 189(2), 221 आणि 115(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये कैदी क्रमांक 1444 तौसीफुद्दीन फेजुद्दीन काजी, 2420 सैयद अबुजर मस्तान सैयद सलीम, 2057 शेख अरबाज शेख मुजीब, शेख शेरजील राज शेख इरफान, 579 समीर शहा नजीर शहा, 254 पवन प्रभाकर सोननकर, 232 पवन बाजीराव वालके, वैभव प्रभाकर सोननकर आणि एक अन्य कैदी. हे सर्व न्यायाधीन कैदी असून यावर्षीच विविध गुन्ह्यांतून अटक होऊन कारागृहात दाखल झालेले आहेत. प्राथमिक तपासानुसार, दोन गटांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू होता आणि रविवारी रात्री किरकोळ कारणावरून हा संघर्ष भडकला. घटनेची पुढील तपासणी पीएसआय शशांक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिस या वादामागील मूळ कारण शोधत आहेत. कारागृह प्रशासनाने मात्र अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button