सीजेआय भूषण गवई 24 ते 26 जुलैदरम्यान अमरावतीत

न्यायालयात ई-लायब्ररीचे उद्घाटन

-रा.सू. गवईंच्या पुण्यतिथी समारोहात उपस्थिती
-दर्यापूर व अमरावतीमध्ये कार्यक्रम
अमरावती / 21 जुलै : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे 24 ते 26 जुलैदरम्यान आपले गृहनगर अमरावतीच्या दौर्‍यावर राहणार आहेत. अमरावती शहरासह दर्यापूर तालुक्यात होणार्‍या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. 25 जुलै रोजी न्यायमूर्ती भूषण गवई यांचे वडिल, माजी राज्यपाल आणि रिपाइं नेते रा. सु. उपाख्य दादासाहेब गवई यांची दहावी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त गवई यांचे पैतृक गाव असलेल्या दर्यापूर तालुक्यातील दारापुर येथे अभिवादन सोहळा आयोजित करण्यात येतो. भूषण गवई यांची दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थिती असते. यंदाही ते दादासाहेब गवई यांना वंदन करण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
24 जुलै रोजी न्या. भूषण गवई यांचे दुपारनंतर अमरावती शहरात आगमन होणार आहे. दुपारी 4 वाजता ते गोपाल नगर स्थित हरिच्छंद्र मंगलम सभागृहात आयोजित एका कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्यात ते उपस्थित राहणार आहे. भूषण गवई यांचे परममित्र रुपचंद खंडेलवाल यांनी खंडेलवार-गवई परिवाराच्या या स्नेहमिलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमानंतर भूषण गवई शासकिय विश्राम गृह येथे मुक्काम करतील.
25 जुलै रोजी सकाळी सीजेआय भूषण गवई सकाळी दारापूरला रवाना होतील. तेथे दादासाहेब गवई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित स्मृती समारोहात ते सहभागी होतील. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित महाविद्यालयाच्या परिसरात दादासाहेब गवई यांची समाधी आहे. तेथे हा स्मृती समारोह होणार आहे. हा कार्यक्रम आटोपून न्या. भूषण गवई दर्यापूरला प्रस्थान करतील. दर्यापूर येथे नवनिर्मित न्याय भवनाच्या इमारतीचे लोकार्पण गवई यांच्या हस्ते होणार आहे. रात्री अमरावती येथे परतून शासकिय विश्रामगृहात सरन्यायाधीश गवई यांचा मुक्काम असेल.
26 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात स्थापन करण्यात आलेल्या ई-लायब्ररीचे उद्घाटन भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. छत्तीसगड उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि नामवंत वरिष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. जुगलकिशोर गिल्डा यांच्या सहकार्याने ही लायब्ररी स्थापन करण्यात आली आहे. लायब्ररीच्या उद्घाटनानित्ताने अमरावती जिल्हा वकिल संघाच्यावतीने सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातील विवेकानंद सभागृहात एका समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नागपूर उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींसह विधी क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती आणि वकिल संघाचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर सरन्यायाधीश भूषण गवई हे सोयीप्रमाणे पुढील दौर्‍याकरिता रवाना होतील.

संबंधित बातम्या

Back to top button