बनावट जन्म दाखल्यांच्या प्रकरणावर शहर पोलिसांची एसआयटी
गाडगेनगरातील सहा आरोपींची चौकशी

-54 संशयास्पद प्रकरणांची तपासणी सुरू
-सीपी चावरियांच्या मार्गदर्शनात वेगाने हालचाली
अमरावती / 15 सप्टेंबर : तहसील कार्यालयातून मिळवण्यात आलेल्या बनावट जन्म प्रमाणपत्रांप्रकरणी आता शहर पोलिस आयुक्तालयाने विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत केले आहे. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी तीन दिवसांपूर्वीच आदेश काढून या तपास पथकाची सूत्रे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बाचाटे यांच्या हाती सोपवली आहेत. गाडगेनगर पोलिस ठाण्यात यापूर्वी 18 फेब्रुवारी रोजी एका महिला नायब तहसिलदाराच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यासह तब्बल 54 संशयास्पद प्रकरणांची तपासणी करण्याची जबाबदारी या नवनियुक्त एसआयटीवर सोपवण्यात आली आहे.
एसीपी बाचाटे यांच्या नेतृत्वाखालील या एसआयटीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार, गाडगेनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल वर, पोलिस निरीक्षक समाधान वाठोरे, पीएसआय रोकडे तसेच काही पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. पथकाने गाडगेनगर पोलीस ठाण्यात गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या देऊन हजारो दस्तावेजांची छाननी सुरू केली आहे. तहसील कार्यालयाने पुरवलेल्या 54 संशयित जन्म प्रमाणपत्रांच्या नोंदींच्या आधारे कोणाकडून व कसे हे दस्तावेज मिळवण्यात आले, या दिशेने तपास वेगाने सुरू आहे. संशयास्पद कागदपत्रांबाबत तहसिलदार कार्यालय, महापालिका आदी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून चौकशी केली जात आहे.
याप्रकरणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावतीसह अंजनगाव सुर्जी व अचलपूर तहसील कार्यालयांत मोठ्या प्रमाणावर फर्जी जन्म दाखल्यांचे घोटाळे झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी अमरावती दौर्यात सीपी चावरिया यांची भेट घेऊन गाडगेनगर पोलिसांनी अद्याप ठोस कारवाई न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरच शहर पोलिस आयुक्तांनी चौकशीला गती देण्यासाठी एसआयटी गठीत केली आहे. याआधी ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी 26 ऑगस्ट रोजी अचलपूर व अंजनगाव सुर्जी येथील प्रकरणांची सेंट्रलाइज चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती.
गाडगेनगर पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या गुन्ह्यात आरिफ रहमान खान (चपराशीपुरा), रहीम खान नियामत खान (बडनेरा), सैय्यद युसुफ अली सैय्यद कादर (मोमिनपुरा, बडनेरा), मोहम्मद निजमुद्दीन मोहम्मद हनीफ मुल्ला (बडनेरा), जमील खान कलिम खान (नमुना) यांच्यासह एका महिलेविरुद्ध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांनी उशिराने मिळणार्या जन्म दाखल्यांसाठी अर्ज सादर करताना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रात खोडामोड करून खोटे दस्तावेज जोडल्याचे उघड झाले होते.
पोलिस आयुक्त स्वतः या तपासावर लक्ष ठेवून आहेत. रविवारी त्यांनी एसआयटी प्रमुख आणि अधिनस्त अधिकार्यांची बैठक घेऊन दोन तासांची सविस्तर समीक्षा केली व आवश्यक दिशा-निर्देश दिले. पुढील काळात एसआयटीची चौकशी आणखी विस्तारित होईल अशी माहिती सूत्रांनी दिली असून लवकरच या प्रकरणांवर चार्जशीट न्यायालयात दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.




