तिवस्यात नागरिकांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

आठ तास वीज नसल्याने संताप

तिवसा / 3 ऑगस्ट : तिवसा शहरात व परिसरात मध्यरात्री तब्बल आठ तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिक अक्षरशः उकळत्या गर्मीत आणि मच्छरांच्या त्रासात रात्र जागून काढण्यास भाग पडले. या अचानक व दीर्घ वीज खंडनामुळे संतप्त नागरिकांनी रात्री उशिरा थेट वीज वितरण कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केले.
तिवसा शहरात शनिवारी रात्री सुमारे 6 वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला. ही समस्या रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहिली. या काळात संपूर्ण शहरासह तालुक्यातील जवळपास 20 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. उकाडा, अंधार आणि मच्छरांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले. घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांचे हाल झाले. वीज नसल्यानं अनेक गावांतील नागरिकांनी मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात रात्र काढली. शेतीसाठी आवश्यक असलेले मोटार पंप बंद राहिल्याने शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले.
या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त नागरिकांनी तिवसा वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. रात्री उशिरा कार्यालयासमोर नागरिकांनी ठिय्या मांडून वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते. या आंदोलनाची माहिती मिळताच अमरावती आणि तिवसा वीज वितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सहायक अभियंता रमेशकुमार मिश्रा, उपविभागीय अभियंता निलेश उईके, चाचणी विभागाचे श्री. गिरी, मंगल ठाकूर, श्री. निघोट, श्रीकांत चुटके यांनी कर्मचारीवर्गासह युद्धपातळीवर काम करत आठ तासानंतर वीजपुरवठा सुरळीत केला.
या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक धनराज थुल, भाजपचे सुधीर वानखडे, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक योगेश वानखडे, प्रणव गौरखडे, उमेश राऊत, नितीन मेहकर, शेतू देशमुख, तुषार लेवटे, अनंत शेंद्रे, राष्ट्रवादीचे अजय सुरटकर हेही उपस्थित होते. तिवसा उपकेंद्रामधील 33/11 केव्ही लाइनच्या ’ए फेज’ ची उढ नादुरुस्त असल्याने हा वीज खंडन झाला. ही समस्या लक्षात येताच अमरावती ग्रामीण विभागाच्या चाचणी व देखभाल विभागाच्या मार्गदर्शनाखाली तिवसा उपकेंद्राची वीज व्यवस्था बदलण्यात आली. सहायक अभियंता रमेशकुमार मिश्रा यांनी सांगितले की, उपकेंद्रातील तांत्रिक बिघाड लक्षात येताच तत्काळ दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल.

संबंधित बातम्या

Back to top button