सेंट कॅथेड्रल चर्च, इर्वीन चौक परिसरात क्रिसमस साजरा
मतदार हक्काबाबत शपथ व मार्गदर्शन

* अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांचे आवाहन
अमरावती /26 डिसेंबर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर स्वीप (डतएएझ) उपक्रमांतर्गत आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व्यापक मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने इर्वीन चौक परिसरातील सेंट कॅथेड्रल चर्चमध्ये आज ख्रिसमस दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित नागरिकांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांनी आपला मतदार हक्क बजावावा यासाठी विशेष मतदार शपथ घेण्यात आली. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व, जबाबदार नागरिक म्हणून सक्रीय सहभाग आणि निर्भय व निष्पक्ष मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांना निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदार नोंदणी, मतदानाचा दिनांक, तसेच मतदान करताना पाळावयाच्या नियमांची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा नाईक यांनी उपस्थितांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत, दि. 15 जानेवारी 2026 रोजी होणार्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक अमरावतीकर मतदाराने मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच सर्वांनी ‘मतदान दूत’ म्हणून कार्य करत इतर नागरिकांनाही मतदानासाठी प्रेरित करावे, असा संदेश त्यांनी दिला.सामाजिक एकोपा, लोकशाही मूल्ये आणि नागरी कर्तव्य यांचा सुरेख संगम साधणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.




