चौकीदाराची शाळेतच गळफास घेउन आत्महत्या

खापर्डे बगिचा आदर्श शाळेतील घटना

अमरावती / 6 जून: शहरातील खापर्डे बगिचा स्थित नामांकित आदर्श प्राथमिक शाळेत रात्रपाळीत सुरक्षेकरिता तैनात असलेल्या चौकीदाराने शाळेतील सभागृहातच गळफास घेउन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शाळेसोबतच परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. आनंद शेषराव राजुरकर (75) असे आत्महत्या करणार्‍या चौकीदाराचे नाव आहे.
आनंद राजुरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून आदर्श शाळेत चौकीदार म्हणून रात्रपाळीत काम करतात. रात्री शाळेच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडल्यानंतर सकाळी शाळेचे मुख्य प्रवेशद्वार उघडण्याचे काम त्यांच्याकडेच होते. आज सकाळी शिक्षक आणि काही कर्मचारी शाळेत पाहोचले तेव्हा शाळेचे मुख्य प्रवेशद्वार बंद होते आणि राजुरकर यांचाही पत्ता नव्हता. आवाज दिल्यानंतर आतून प्रतिसादही मिळाला नाही. अशात कोणाचीतरी नजर शाळेच्या प्रांगणात असलेल्या सभामंचावर पडली. एका कोपर्‍यात त्यांना आनंद राजुरकर गळफास घेउन लटकलेल्या स्थितीत आढळून आले. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती तात्काळ शहर कोलवाली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहोचून प्रवेशद्वार उघडले. यावेळी परिसरात वार्ता पसरल्याने बघ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह खाली काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. पंचनामा करुन पोलिसांनी अकस्तिम मृत्युची नोंद केली.

संबंधित बातम्या

Back to top button