मेळघाटातील दवाखान्याच्या व्हरांड्यात प्रसूती

डॉक्टर-नर्स गायब असल्याने गर्भवतीची मोठी हालअपेष्टा

* हतरू आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

चिखलदरा /21 जानेवारी : मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा किती बोजवारा उडाला आहे, याचा धक्कादायक प्रकार हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर आला. सोमवार 19 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 वाजता खुटीडा गावातील एका गर्भवती माऊलीला प्रसूती कळा सुरू झाल्याने दवाखान्यात आणले होते, मात्र तिथे एकही डॉक्टर किंवा नर्स हजर नव्हती.
अखेर मदतीविना या माऊलीने रुग्णालयाच्या उघड्या व्हरांड्यातच बाळाला जन्म दिला. या गंभीर घटनेमुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये प्रशासनाविरुद्ध मोठा संताप असून दोषींवर कडक कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मेळघाटच्या दुर्गम भागातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा मिळणे किती कठीण झाले आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होते. प्रसूती कळांनी व्याकुळ झालेल्या त्या माऊलीला घेऊन तिचे कुटुंब मोठ्या आशेने हतरूच्या दवाखान्यात आले, पण तिथे सर्वत्र शुकशुकाट होता. नातेवाईकांनी कर्मचार्‍यांना खूप शोधले, हाका मारल्या, पण कोणाचेही दर्शन झाले नाही. अखेर वेळ निघून गेली आणि त्या माऊलीची प्रसूती दवाखान्याच्या बाहेरच झाली. प्रसूतीनंतरही बराच वेळ कोणीच मदतीला न आल्याने, आई आणि बाळाच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला होता. संतापलेल्या कुटुंबीयांनी शेवटी त्या अवस्थेतच माय-लेकीला घरी नेले. या बेजबाबदार कारभारावर राजकुमार पटेल यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मेळघाटातील आरोग्य विभाग सध्या वार्‍यावर असून कर्मचार्‍यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. ही घटना अत्यंत लाजिरवाणी असून, जर दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही, तर सेमाडोह येथे मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. आता या घटनेनंतर आरोग्य विभाग झोपेतून जागा होणार का, हाच मोठा प्रश्न आहे.
जीवाशी खेळणारी आरोग्य यंत्रणा-दवाखान्यात हजर नसणार्‍या कर्मचार्‍यांमुळे एका माऊलीला उघड्यावर प्रसूती करावी लागली, ही बाब प्रशासनासाठी शरमेची आहे. आई किंवा बाळाला काही झाले असते तर जबाबदारी कोणाची? या घटनेची तातडीने चौकशी करून हलगर्जीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता संपूर्ण परिसरातून होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button