अमरावती-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल
ऑक्टोबरपासून सकाळची सोय

-चार दिवसांच्या फ्लाइटची शक्यता
अमरावती / 16 सप्टेंबर : अमरावतीहून मुंबईकडे हवाई प्रवास करणार्या प्रवाशांसाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. अलायन्स एअर कंपनीने आपल्या अमरावती-मुंबई हवाईसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला असून या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे. यामुळे प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर ठरणार आहे.
नव्याने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार, मुंबईवरून सकाळी 7.05 वाजता विमान सुटेल आणि ते सकाळी 8.50 वाजता अमरावती विमानतळावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात सकाळी 9.15 वाजता अमरावती विमानतळावरून टेकऑफ होऊन सुमारे 11 वाजता विमान मुंबई विमानतळावर उतरणार आहे. अशा प्रकारे सकाळी मुंबई गाठल्याने प्रवाशांना दिवसभरातील सरकारी, व्यवसायिक वा वैयक्तिक कामे आरामात पार पाडणे शक्य होणार आहे.
अमरावतीमध्ये तब्बल पाव शतकाच्या प्रतीक्षेनंतर विमानतळ सुरू झाल्यावेळी नागरिकांना केलेली हवाईसेवेची मोठी अपेक्षा काहीशी फोल गेली होती. कारण, अंमलात आलेल्या हवाईसेवेत आठवड्यात फक्त तीनच दिवस फ्लाइट उपलब्ध होती, तीही दुपारनंतरच्या वेळेत. यामुळे मुंबईला तत्कालीन वेळेवर जाऊन त्या दिवशीच शासकीय वा व्यावसायिक कामकाज करणे शक्य होत नव्हते. परिणामी प्रवासी विमानाऐवजी रेल्वेगाड्यांचा पर्याय निवडत होते. या असुविधेच्या पार्श्वभूमीवर सततच्या मागणीनंतर अलायन्स एअरने वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सकाळच्या वेळा निश्चित झाल्यामुळे ही हवाईसेवा आता व्यवहार्य होणार आहे, असे जाणकारांचे मत आहे.
त्यातही आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आठवड्यात तीन दिवसांपुरती मर्यादित असलेली ही सेवा आता चार दिवस उपलब्ध करून देण्याची दाट शक्यता आहे. जर हे वास्तव झाले, तर अमरावतीकरांसाठी विमान प्रवास अधिक सुलभ होऊन हवाई मार्गाकडे ओढ वाढेल. या बदलामुळे आता अमरावतीकरांना कामकाजाचा पूर्ण दिवस मिळू शकणार आहे. हवाई सेवेतून प्रवासाचा अनुभव सुधारण्याबरोबरच या निमित्ताने प्रवासीसंख्येत आणि मागणीतही वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.




