सुट्ट्यांच्या गर्दीसाठी मध्य रेल्वेने सोडल्या विशेष गाड्या

अमरावती ते पनवेल मार्गावर धावणार अनारक्षित गाडी

* कोल्हापूर आणि नांदेड प्रवाशांनाही मोठा दिलासा

अमरावती /21 जानेवारी : सलग येणार्‍या सार्वजनिक सुट्ट्यांचा काळ लक्षात घेता रेल्वे गाड्यांमध्ये होणारी प्रवाशांची तुफान गर्दी थोपवण्यासाठी मध्य रेल्वेने राज्यांतर्गत विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने अमरावती, कोल्हापूर आणि नांदेड या शहरांसाठी विशेष फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले असून, अमरावतीकरांच्या सोयीसाठी पनवेलपर्यंत अनारक्षित गाडी धावणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि नियोजित होण्यास मोठी मदत होणार आहे.
मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे ऐन सुट्ट्यांच्या काळात गावी जाणार्‍या किंवा पर्यटनासाठी निघणार्‍या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. यामध्ये विदर्भातील प्रवाशांच्या सोयीसाठी अमरावती ते पनवेल दरम्यान विशेष अनारक्षित गाडी चालवण्यात येत आहे. गाडी क्रमांक 01416 ही अमरावती येथून 22 जानेवारी रोजी दुपारी 12.00 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 4.00 वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01415 ही 26 जानेवारी रोजी पनवेल येथून सायंकाळी 7.50 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी 12.00 वाजता अमरावतीला येईल. या गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड मार्ग, पुणे, लोणावळा आणि कर्जत असे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीत शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.
तसेच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कोल्हापूरसाठी 24 जानेवारी रोजी रात्री विशेष गाडी सुटेल, तर कोल्हापूरवरून 26 जानेवारीला परतीची गाडी धावेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, पुणे आणि सातारा मार्गे थांबे असतील. मराठवाड्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड दरम्यान 23 आणि 24 जानेवारी रोजी विशेष फेर्‍यांचे आयोजन केले आहे. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक, मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे धावेल. या सर्व गाड्यांमुळे सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची होणारी ओढाताण थांबणार असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
अमरावतीकरांसाठी रेल्वेची मोठी पर्वणी -अमरावती ते पनवेल या मार्गावर धावणारी विशेष गाडी पूर्णपणे अनारक्षित असल्याने ऐनवेळी प्रवास करणार्‍या नागरिकांसाठी ही मोठी संधी आहे. यामध्ये 16 शयनयान डब्यांसह सामान्य श्रेणीची व्यवस्था आहे. बडनेरा आणि अकोला परिसरातील प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी या सुविधेमुळे मोठा आधार मिळाला असून सुट्ट्यांचा आनंद आता रेल्वेच्या सुखकर प्रवासाने घेता येईल.

संबंधित बातम्या

Back to top button