84 लाखांच्या फसवणूक प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल

रक्षा मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष

-बोगस इंटरव्यु कॉल आणि कागदपत्रांचा सहारा
-अनेक युवकांना लुबाडले, नागपूरी गेट पोलिसांची कारवाई
अमरावती / 8 जुलै: केंद्रीय मंत्रालयात आपले लागेबांधे असून तेथे नोकरी लावून देउ, अशी बतावणी करुन जिल्ह्यातील काही युवकांकडून 84 लाख रुपये उकळत त्यांची फसवणूक करणार्‍या दोघांवर अखेर नागपूरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2023 ते 2025 या कालावधीत हा फसवणूकीचा प्रकार घडला आहे. हाफीज खां भूरे खां पठान आणि मोसिन खान अशी आरोपींची नावे आहेत. बोगस इंटरव्यु आणि कागदपत्रांच्या सहाय्याने आरोपींनी या बरोजगार युवकांकडून लाखो रुपये लुबाडले, असा त्यांच्यावर आरोप आहे.
यासंदर्भात 30 वर्षीय अंकुश नामक युवकाने नागपूरी गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अंकुशने स्वत:च्या नोकरीसाठी आपले जावई प्रमोद पोकळे यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी आपली एका निवृत्त सैन्य अधिकार्‍याशी ओळख आहे व ते आपल्याला नोकरी मिळवून देण्याकरिता मदत करु शकतात, असे सांगितले होते. त्यानुसा पोकळे अमरावतीच्या लालखडी परिसरातील सुफियान नगर येथे राहणार्‍या हाफिज खान भूरे खान पठान याच्याकडे नोकरीच्या निमित्ताने गेले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हाफिज खानने नोकरीसाठी 20 लाख रुपये खर्च करावे लागतील, असे सांगितले. तेव्हा पोकळे यांनी 18 लाख रुपये देण्याचे मान्य केले. 6 लाखांची पहिली किश्तही त्यांनी हाफिज खान याला दिली.
त्यानंतर मुलाखतीसाठी अंकुशला नागपूर येथे बोलावण्यात येणार असल्याचा विश्वास हाफिजने दिला. काही दिवसांनी त्याने पून्हा 12 लाख रुपयांची मागणी केली. पोकळे आणि अंकुश हे नागपूर येथे गेले असता त्यांची हॉटेल बांबे येथे मोहसिन खान याच्याशी गाठ घालून देण्यात आली. मोहसिन खानने कारमध्येच अंकुशची मुलाखत घेतल्याचा देखावा केला आणि त्यांच्याकडून सहा लाख रुपयेही घेतले. त्यानंतर पून्हा पोकळे आणि पठाण यांचा फोन आल्याने तक्रारकर्ता कागदपत्र घेउन नागपूरला गेला. यावेळीही त्याने 4 लाख रुपये पठाणला दिले. काही दिवसांतच प्रशिक्षणासाठी वॉट्सअपवर पत्र येणार असल्याची बतावणी त्याने केली.
नंतर आयकार्ड आणि नियुक्तीपत्र घेण्यासाठी अंकुशला नागपूर येथे बोलाविण्यात आले. दोन लाख रुपयेही आणावयास सांगितले. यावेळी अंकुशने दीड लाख रुपये पठाणला दिले. त्यानंतर नागपूर ऑर्डिनंस फॅक्ट्रीचे कॉल लेटर आले. 26 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता त्याला बोलाविण्यात आले. यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अंकुश नागपूरला जाउ शकला नाही. तेव्हा त्याच्याकडून आरोपीने 51 हजार 240 रुपये मागवून घेतले. दीड महिन्यानंतर अंकुशने आरोपीशी संपर्क साधला असता वेळेवर उपस्थित न राहील्याने तुमच्या कामाला आणखी वेळ लागेल, असे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर आरोपीकडून उडवाउडवीची उत्तरे देवून टाळाटाळ चालविण्यात आली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अंकुशने नागपूरी गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीने अंकुशकडून 18 लाख 1 हजार 240 रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील अनिकेत लांजेवर आणि प्रतिक लांजेवार यांच्यासोबतही अशाच पद्धतीने धोकाधडी करुन 40 लाख रुपये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली उकळण्यात आले आणि प्रमोद पोकळे यांचे दोन पुतणे धनंजय व आदित्य तसेच संकेत नामक एका बेरोजगार युवकाकडून 26 लाख 1 हजार रुपये घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर तक्रारीत तथ्थ्य आढळून आले. हाफिज खां भूरे खां पठान आणि मोसिन खान यांनी बेरोजगार युवकांची 84 लाख रुपयांनी लुबाडणूक केल्याच्या स्पष्ट झाल्याने नागपूरी गेट पोलिसांनी दोन्ही आरोपींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक पंकज गुप्ता करित आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button