राजुरवाडी वळनावर पून्हा कार उलटली, दोघे सुखरुप

पाच दिवसांत दुसरा अपघात

-ठिकाण बनले धोकादायक
-प्रशासनाकडून उपाययोजना नाही
मोर्शी / 27 जुलै : पाच दिवसांच्या अंतराने एकाच ठिकाणी दुसर्‍यांदा चिखलदर्‍याला जाणार्‍या पर्यटकांचे वाहन उलटून अपघात घडला. तिवसा ते नेरपिंगळाई मार्गावर राजुरवाडी गावानजीकचे हे वळन अत्यंत धोकादायक ठरत आहे. सुदैवाने यावेळीही अपघातग्रस्त कारमधील दोन तरुण सुखरुप बचावले. मात्र वारंवार दुर्घटना होउनही प्रशासनाकडून उपाययोजनेसंदर्भाने कोणतीही पावले उचलली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येथे अपघातात जिवितहानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
22 जुलै रोजी नागपूरचे काही पर्यटक कारने तिवसा-नेरपिंगळाई मार्गे चिखलदराकडे जाताना त्यांची कार राजुरवाडीनजीकच्या वळनावर चालकाचे संतुलन बिघडल्याने रस्त्याच्या कडेला उलटली होती. तेव्हा दैव बलवत्तर म्हणून कारमधील चौघांचा जीव वाचला होता. त्यांचे केवळ किरकोळ दुखापतीवर निभावले होते. आज 27 जुलै रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास जनू 22 तारखेच्या घटनेचीच याठिकाणी पूनरावृत्ती झाली. प्राप्त माहितीनुसार नागपूरच्या कुळकर्णी लेआउट येथील रहिवासी सचिन रविंद्रकुमार अवस्थी (36) हा युवक आपल्या एका मित्रासह कारने तळेगाव, तिवसा मार्गे राजुरवाडी येथून चिखलदरा जाण्यासाठी निघाला होता. सचिन अवस्थी कार चालवत होता.
राजुरवाडी येथे त्याच वळनावर एमएच 13 / डीई 2002 क्रमांकाची त्यांची क्रेटा कार सचिनचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली. वळनावर समोरून येणार्‍या वाहनाचा प्रकाश डोळ्यावर पडल्यामुळे चालकाला रस्ता दिसला नाही आणि हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधील दोन्ही युवकांना किरकोळ मार बसला. माहिती मिळाल्यानंतर शिरखेडचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किसन धुर्वे, कुंजाराम मेटकर घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. अपघातात कारचे मोठे नूकसान झाले आहे.
राजुरवाडी येथे मार्गावर धोकादायक वळन आहे. तीन गावांना जोडणार्‍या मार्गाचा हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे याआधीही येथे अनेकदा अपघात घडले असून हे ठिकाण अत्यंत धोकादाय ठरत आहे. येथे दिशादर्शक आणि सूचना फलक लावल्यास चालकांना मार्गदर्शन होउन अपघात टाळले जाउ शकतात. परंतू वारंवार मागणी होउनही अशा उपाययोजना करण्यासंदर्भाने प्रशासनाचा ढिम्मपणा दिसून येत आहे. आतातरी अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती पाउले उचलण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उबाठाच्या युवासेनेचे कार्यकर्ते मंगेश वाघ यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button