उमेदवारांची धावपळ, थकबाकी भरण्यासाठी लगबग

निवडणुकीची चाहूल आणि नगरपरिषदेचा वाढलेला उत्साह!

* कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी

* महसूल वसुलीला नवे बळ

परतवाडा/14 नोव्हेंबर -परतवाडा नगर परिषदेच्या डिसेंबरमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होताच अचलपूर शहरात निवडणुकीचे वातावरण रंगत चालले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे उमेदवार, सूचक आणि अनुमोदक यांच्यावर कोणताही कर थकीत नसावा! ही अट लागू होताच अचलपूर नगरपरिषद कार्यालयात मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांची अक्षरशः मोठी रांग लागली आहे. निवडणुकीचा उत्साह थेट करसंकलनाच्या काऊंटरपर्यंत पोहोचला असून, पालिकेची तिजोरीही या काळात बर्‍यापैकी समृद्ध होत आहे.उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी अनेक उमेदवारांकडे मागील तीन ते चार वर्षांची कर थकबाकी असल्याचे दिसून आले. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच उमेदवार आणि नागरिक दोघांनीही थकीत कराची रक्कम भरण्यास प्राधान्य दिले. नगर परिषदेने वाढत्या गर्दीची दखल घेत करसंकलनासाठी अतिरिक्त काऊंटर सुरू केले असून, कर्मचारी वर्गालाही पूर्ण क्षमतेने कामाला लावण्यात आले आहे. मुख्याधिकारी धीरज कुमार गोहाड यांच्या निर्देशानुसार उमेदवारांना ‘नो ड्यू सर्टिफिकेट’ सहज उपलब्ध व्हावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची रक्कम मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. काही उमेदवारांकडे तर अनेक वर्षांचा कर थकीत असल्याचे उघड झाले असून, त्यांनी ‘वन-टाइम क्लिअरन्स’च्या माध्यमातून संपूर्ण थकबाकी एकाच वेळी फेडून ‘नो ड्यू’ घेतले आहे. याशिवाय, उमेदवार आणि अनुमोदक यांनी घरात शौचालय असल्याचा दाखला सादर करणे अनिवार्य असल्याने दाखले घेण्यासाठीही गर्दी वाढली आहे. नगर परिषदेच्या महसूल वसुलीत आशादायक वाढ होत असून, निवडणुकीच्या शेवटपर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार आणि नागरिकांकडून ‘कर निरंक’ होण्याची धांदल जोरात सुरू आहे. सूचक आणि अनुमोदक यांनीही आपला थकीत कर भरण्याचे आवाहन मुख्याधिकारी गोहाड यांनी केले आहे.
निवडणुकीत करभरणा वाढला…-नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करसंकलनाला अनपेक्षित वेग मिळाला आहे. अनेक नागरिकांनी थकबाकी भरण्यासाठी स्वयंस्फूर्ती दाखवत नगरपरिषदेच्या कार्यालयात धाव घेतली आहे. उमेदवारांच्या सक्रिय जनसंपर्कामुळे करदात्यांमध्ये जागरूकता वाढली असून करभरण्याच्या रकमेतील वाढ नगरपरिषदेच्या आर्थिक शिस्तीसाठी महत्त्वाची ठरत आहे. निवडणूक वातावरणामुळे प्रशासनाकडे ये-जा वाढली असून कर विभागाचा ताणही वाढला आहे. एकूणच, निवडणूक काळाने शहराच्या आर्थिक आरोग्याला बळकटी दिल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button