पीक अप व्हॅनला बसची धडक; दोघींचा मृत्यू

पाच महिला मजूर गंभीर जखमी

* मृतकांसह सर्व जखमी धारणी येथील रहिवासी

बुलढाणा /11 डिसेंबर – देऊळगाव राजा येथील कापूस जिनिंगमध्ये परराज्यासह अमरावती जिल्ह्यातून आलेल्या अनेक महिला मजुरांचे वास्तव्य आहे. रोजीरोटीच्या शोधात आलेल्या या महिला आज गुरुवारी (दि 11.) कापूस वेचण्यासाठी पिंपळगाव येथे जाण्यासाठी मालवाहू पिकअप (एम एच 38 ई 2082) मध्ये चढत होत्या. याच दरम्यान जाफराबाद-जालना मार्गावरून जाणार्‍या एसटी बस (क्रमांक एम एच 20 बी एल 2276 ) ने पिकअपला मागून भरवेगात जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दोन मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला. धडकेची तीव्रता एवढी होती की दोन्ही मृतदेहांचा अक्षरशः चुराडा झाला होता, अशी माहिती डॉक्टर अक्षय गुठे, चालक सुभाष कणखर आणि समाधान आघाव यांनी दिली. या अपघातात सुहाना प्रतिराम इपने (वय 16 वर्षे, राहणार नांदुरी, तालुका धारणी, खुशबू बबलू पालवी (वय 17, राहणार तागमला, तालुका खगनार, जिल्हा बुरहानपूर, सुलोचना हारासिंग सहारे (वय 35 वर्षे, राहणार भगवानपुरा, नांदोरी तालुका धारणी, पुरुषाने मंगल इपने (वय 22, रा. भगवानपुरा, ता. धारणी, नर्मदा सोनू इपने (वय 45, रा. नांदुरी, ता. धारणी, जि. अमरावती या गंभीर जखमी झाल्या आहेत. या सर्व जखमी महिलांना प्रथम देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जालना येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये तूर्तास मर्ग दाखल करण्यात आला आहे सखोल तपास अंती गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी दिली. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button