महेश नगरात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

कुटुंब पुण्याला, चोरट्यांनी साधली संधी

अमरावती / 21 जुलै : घरात कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घराचे कुलुप तोडून 2.25 लाख रुपयांच्या रोख रकमेसह एकुण सात ते आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. घरफोडीची ही घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत महेश नगर येथे मंगलमूर्ती लेआउट परिसरात घडली. निर्मल मांगीलाल लढ्ढा यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष केले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
निर्मल लढ्ढा यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, निर्मल लढ्ढा यांचे मंगलमूर्ती लेआउटमध्ये प्लॉट क्रमांक 67 मध्ये निवासस्थान आहे. ते 18 जुलै रोजी आपल्या कुटुंबियांसह घराला कुलुप लावून पुणे येथे गेले होते. आज सकाळी लढ्ढा कुटुंबिय घरी परतले तेव्हा त्यांना मुख्य दरवाजाचे कुलुप तुटलेले दिसले. आत प्रवेश केला असता घरातील संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. आलमार्‍यांची कुलुपेती तोडण्यात आली होती. आलमारीतील सोन्या-चांदीचे दागीणे आणि 2.25 लाख रुपयांची रोकड असा सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी हा ऐवज त्यांच्या घरातून लंपास केला होता.
घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांतील फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहे. चोरीच्या या घटनेमुळे महेश नगर परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सावध राहण्याचा सल्ला एकमेकांना दिला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button