धारणी येथे पशु व्यापार्‍याची निर्घृण हत्या

धान्य मार्केटमध्ये 10 ते 12 अज्ञातांचा हल्ला

* दोघा भावांवर चाकुने सपासप वार
* एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर

धारणी /6 ऑक्टोबर : धारणी येथील स्थानिक धान्य बाजारात गुरांच्या खरेदी-विक्रीत सहभागी असलेल्या दोन भावांवर 10 ते 12 अज्ञातांनी चाकू आणि तलवारींसह धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पशु व्यापारी फजिल अकील बेग (45) जागीच ठार झाला, तर त्याचा भाऊ नाझिल अकील बेग (40) गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून, पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हा खून आर्थिक वादातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोट तालुक्यातील हिवरखेड येथील रहिवासी फाजिल बेग आणि नाझिल बेग हे जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी धारणी येथे बैल बाजाराचा दिवस असल्याने दोन्ही भाऊ आपल्या वडिल अकील बेग यांच्यासोबत गुरे खरेदी-विक्रीसाठी आले होते. बैल बाजार संपल्यानंतर तिघेही काही कामासाठी धारणी शहरात परतले. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन्ही भाऊ धान्य मार्केटजवळ उभे असताना, अचानक 10 ते 12 जणांनी चाकू आणि तलवारींसारख्या धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्याचे कारण आर्थिक व्यवहारातील वाद असल्याची जोरदार चर्चा आहे. या हल्ल्यात दोन्ही भाऊ गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले, तर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि दोन्ही भावांना उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासणीनंतर फजिल बेगला मृत घोषित केले, तर नाझिल बेगला गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले.

या घटनेची बातमी धारणी आणि अकोट तालुक्यात वेगाने पसरली असून संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रात्री उशिरा मृत फजिल बेगच्या कुटुंबीयांनी धारणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की फजिल आणि नाझिल बेग यांच्यात हिवरखेड परिसरातील लेआउटसंबंधी वाद होता, आणि त्यातूनच ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धारणी पोलिस सर्व शक्य घटकांचा विचार करून या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

 

संबंधित बातम्या

Back to top button