राजकीय उपेक्षेच्या धक्क्यानेच गेलं भावाचं आयुष्य
गोपाल कुलकर्णींचा भाजप पदाधिकार्यांवर आरोप!

-उपेंद्र कोठेकरांसमोरच सुनावले खडेबोल
-डॉ. प्रणय कुलकर्णींच्या निधनानंतर राजकीय खळबळ
अमरावती / 30 जुलै : भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि मनपाचे माजी स्वीकृत नगरसेवक डॉ. प्रणय कुलकर्णी यांचं वयाच्या 58 व्या वर्षी अकस्मात निधन झाल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली आहे. राजकीय उपेक्षा आणि मानसिक तणावामुळेच भावाचं आयुष्य गेले, असा थेट आरोप त्यांच्या भावाने गोपाल कुलकर्णी यांनी भाजपचे प्रदेश संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्यासमोर केला.
डॉ. प्रणय कुलकर्णी यांच्या अंत्यदर्शनासाठी डॉ. उपेंद्र कोठेकर हे त्यांच्या मांगीलाल प्लॉट येथील निवासस्थानी गेले असता, गोपाल कुलकर्णींनी त्यांना थेट फटकारलं. भाजपासाठी संपूर्ण आयुष्य दिलं, पण शेवटी अपमान आणि उपेक्षाच पदरी आली, असा आक्रोश त्यांच्या बोलण्यात होता. गोपाल कुलकर्णी यांनी सांगितलं की, काही मंडळींनी पक्षात पद मिळवण्यासाठी डॉ. प्रणय कुलकर्णींना सोबत घेऊन मुंबई, नागपूरपर्यंत फिरवले. कार्याध्यक्ष किंवा महासचिव करण्याचं आश्वासन देण्यात आलं. मात्र एकदा पद मिळताच त्याच लोकांनी पाठ फिरवली, फोनसुद्धा उचलणं बंद केलं.
उपेक्षा, अपमान, अव्यवस्थेचं ओझं मनावर घेतलेल्या डॉ. कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज आणि त्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर प्रकृती ढासळत गेली आणि अखेर त्यांचं दुःखद निधन झालं. भाजपमध्ये सध्या नव्या, संधीसाधू चेहर्यांना गोंजारलं जातंय आणि जुने निष्ठावान कार्यकर्ते बाजूला फेकले जात आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे. भावाने आत्मगौरवासाठी कधीच सौदेबाजी केली नाही, त्याचंच बक्षीस उपेक्षेच्या रूपात मिळालं, असं गोपाल कुलकर्णींनी ठणकावून सांगितलं.
या घटनेनंतर भाजपमध्ये अंतर्मुख होण्याची गरज निर्माण झाली आहे. निष्ठावान कार्यकर्त्याला जर राजकीय हाशियावर ढकललं जाणार असेल, तर हे पक्षसंवेदनशीलतेचं आणि नेतृत्वाच्या प्राथमिकतेचं अपयश आहे, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागला आहे.




