लाचखोर सरपंच पती एसीबीच्या जाळ्यात
मानधनाच्या पैशासाठी लाचेची मागणी, पाच जणांवर गुन्हा दाखल

अमरावती /3 डिसेंबर : अॅन्टी करप्शन ब्युरोने ग्राम कवठा बहाळे येथील ग्रामरोजगार सेवकाच्या मानधनाचा चेक देण्यासाठी लाच मागणार्या सरपंचपती, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि कंत्राटदारावर मोठी कारवाई केली आहे. तक्रारदाराने केलेल्या कामासाठी 1 लाख 62 हजार पाचशे रुपयांचा चेक सरपंचांच्या सहीसाठी दिल्यानंतर, सरपंच सौ. किरण मेश्राम यांचे पती शशीकांत मेश्राम आणि ग्रामसेवक सुरेंद्र कुरवाडे यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार अॅन्टी करप्शनकडे करण्यात आली होती.
यानंतर दोन टप्प्यांत झालेल्या पडताळणीदरम्यान सरपंचपतीने 40 हजार आणि ग्रामसेवकाने 30 हजार रुपयांची मागणी कायम ठेवत लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे स्पष्ट झाले. या प्रक्रियेत विस्तार अधिकारी प्रल्हाद तेलंग आणि कंत्राटदार चंदन नागमोते यांनीही तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रवृत्त केले असल्याचे निष्पन्न झाले. दि. 19 नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला असता आरोपींना तक्रारदाराविषयी संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही. तरीदेखील लाच मागणी आणि दबावाचे ठोस पुरावे मिळाल्याने चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन खोलापुरी गेट येथे सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरोच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने यशस्वीपणे पार पाडली. नागरिकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध धाडसाने पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन अॅन्टी करप्शनतर्फे करण्यात आले आहे.




